पुणे (Pune) : जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील बोपोडी चौकातून शिवाजीनगरकडे येणारा रस्ता आजपासून (ता. १) खुला करण्यात येणार आहे. हा रस्ता दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
बोपोडी ते संविधान चौकदरम्यान मेट्रोचे काम सुरू होते. तसेच रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे बोपोडी ते खडकी स्थानकादरम्यान दोन वर्षांपासून वाहतूक बंद होती. शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक खडकी बाजारमार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे आरे चौकात येऊन वाहनचालकांना पुढे जावे लागत होते. या वाहतुकीमुळे बोपोडी, खडकी, औंध रस्ता ते पिंपरीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागत होत्या. वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
मेट्रोचे काम पूर्ण झाल्यामुळे बोपोडी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून करण्यात येत होती. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका आणि वाहतूक शाखेकडून प्रयत्न सुरू होते.
आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या समन्वयातून बैठका घेण्यात आल्या. मागील आठवड्यात संयुक्त पाहणी करून हा रस्ता सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार हा रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उर्वरित रुंदीकरणासाठी आणखी कालावधी
या रस्त्यावरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर हटविण्यात आली आहेत. हा रस्ता खुला करण्यात येत असला तरी रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे उर्वरित काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. हा रस्ता आठ पदरी झाल्यानंतर सर्व प्रकारची वाहतूक दुहेरी सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.