Traffic  Tendernama
पुणे

Pune : महापालिकेच्या 'या' कारवाईमुळे विद्यापीठ चौकातील कोंडी कमी होणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे, ता. ११ ः औंध, बाणेरकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता असणाऱ्या जयकर पथावरील साई चौकातील बॉटलनेट महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने नुकताच काढून टाकला.

या रस्त्यातील ४४ दुकाने हटविण्यात आल्याने अतिरिक्त चार लेनचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे. कारवाईनंतर रात्री लगेच डांबरीकरण सुरू झाले. या कारवाईमुळे गणेशखिंड रस्त्यावरील ताण कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

ब्रेमेन चौकाकडून खडकीकडे जाण्यासाठी २४ मीटर रुंदीचा जयकर पथ आहे. मात्र खडकी रेल्वेस्थानकाच्या पाठीमागच्या बाजूला साई चौक, रेल्वे भुयारी मार्गादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लष्कराच्या जागेत दुकाने असल्याने केवळ १२ मीटरचा रस्ता वापरात होता. त्यामुळे रोज सकाळी व सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व खडकी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात ही दुकाने पाडून टाकण्याचा निर्णय झाला होता. मात्र कायदेशीर प्रक्रिया, पोलिस बंदोबस्त यामुळे कारवाईला विलंब झाला. अखेर महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाने संयुक्त कारवाई करत सुमारे २०० मीटरचा रस्ता अतिक्रमणमुक्त केला.

थेट विमानतळ, नगर रस्त्याकडे जाता येणार
गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो व उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. बाणेर, औंध, बालेवाडी, पाषाण या भागातील नागरिकांना विमानतळ, नगर रस्ता, शिवाजीनगर येथे जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता साई चौक परिसरातील दुकाने काढून टाकल्याने सुमारे २०० मीटर लांबीचा बॉटलनेक कायमचा निघाला आहे. त्यामुळे औंध, बाणेर भागातील नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी हे काम करण्यात आले आहे.