PMC Pune Tendernama
पुणे

Pune : परिस्थीती हाताबाहेर गेल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग येणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पर्वती टेकडीवर मंदिराच्या मागे तसेच महापालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये राडारोडा टाकला जात आहे. परिसराला अक्षरशः डंपिंग ग्राउंड’चे स्वरूप आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

हॉटेल, पोल्ट्रीमधील कचरा, टाकाऊ वस्तू, जुने कपडे आणि एवढेच नाही तर मृत जनावरेदेखील येथे आणून टाकली जात आहेत. स्थानिक नागरिकांनी त्याविरुद्ध आवाज उठवूनही महापालिका व वनविभाग याकडे अद्याप गांभीर्याने बघत नसल्याची सद्यःस्थिती आहे. परिस्थीती हाताबाहेर गेल्यानंतरच अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

पर्वती गावठाणाजवळील लक्ष्मीनगर येथील श्री रमणा गणपती मंदिर, हिरे हायस्कूल येथून पर्वती टेकडीवरील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने रस्ता जातो. पूर्वी पाण्याच्या टाकीच्या परिसरात जाण्यासाठी केवळ कच्चा रस्ता होता. या रस्त्याचा वापर जनता वसाहतीमधील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, घरेलू कामगार व अन्य कष्टकरी नागरिकांकडून केला जात होता. तसेच स्थानिक नागरिक टेकडीवर फिरायला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करत होते, मात्र मागील काही वर्षांपासून या रस्त्यावरही वर्दळ वाढली आहे.

कचरा विलगीकरण केंद्रही कचऱ्यात

लक्ष्मीनगर येथील पॅनोरमा सोसायटीसमोरून पर्वती पाण्याची टाकी व पर्वती मंदिराकडे रस्ता जातो. या रस्त्यावर काही प्रमाणात डांबरीकरण केले आहे. त्यावरूनच आता सर्रासपणे टेम्पो, ट्रक टेकडीवर नेऊन तेथे रात्रंदिवस बांधकामातील राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे टेकडीवर ठिकठिकाणी राडारोडा, कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत.

त्याचबरोबर परिसरातील पोल्ट्री, हॉटेल्स, रेस्टॉरंट, चिकन, मटण स्टॉल, भाजी विक्रेत्यांकडील कचरा, मृत जनावरे देखील टेकडीवरील जंगलात आणून टाकली जात आहेत. त्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीचा त्रास पॅनोरमा, विष्णू दर्शन, अमोघ या सोसायट्यांमधील रहिवाशांसह हिरे हायस्कूल, शाहू कॉलेजमधील विद्यार्थी व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. विशेषतः महापालिकेचे कचरा विलगीकरण केंद्रही कचऱ्यातच पडून आहे.

नागरिकांचे फिरणे बंद

कचरा व राडारोडा टाकल्याने तेथे श्‍वानांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यासह राडारोडा टाकण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा त्रास वन्यप्राणी, पक्ष्यांवर होऊ लागल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेषतः सायंकाळी सहा वाजल्यानंतर पर्वती टेकडी, पाण्याची टाकी, पर्वती मंदिराच्या पाठीमागील बाजूला मद्यपींचा वावर वाढतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

ट्रक, टेम्पोतून भरदिवसा राडारोडा, कचरा टेकडीवर टाकला जातो. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार केली आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुर्गंधीमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे.

- मंदाकिनी निंबाळकर, रहिवासी

टेकडीवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने आता आम्ही फिरायला जाणेही बंद केले आहे. श्‍वानांसह अन्य प्राणी वाढल्याने जंगलातील पक्षी, प्राणी आता दिसत नाहीत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

- माधुरी म्हसवडे, रहिवासी

पर्वती टेकडी परिसरात राडारोडा टाकला जात असल्याची तक्रार आमच्याकडे अद्याप आलेली नाही. तरीही, यासंदर्भात वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना यासंदर्भात तत्काळ सूचना दिल्या जातील.

- महादेव मोहिते, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे वनविभाग

टेकडीवर राडारोडा टाकण्याच्या प्रकाराची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येईल. त्यांच्याकडून राडारोडा टाकणाऱ्यांवर

योग्य कारवाई केली जाईल.

- बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका