पुणे (Pune) : जलपर्णी काढण्याच्या कामात मलःनिसारण विभागाकडून सुधारणा केली जात नसल्याने हे काम आता पर्यावरण विभागाकडे देण्यात आले. मात्र, नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
मुळामुठा नदीमध्ये ठिकठिकाणी जलपर्णी वाढत असताना ठेकेदाराकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातून वाहणाऱ्या मुळामुठा नदीमध्ये जलपर्णी वाढत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होतो. त्यामुळे दरवर्षी महापालिकेतर्फे शहरातील पाषाण, कात्रज यासह इतर तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ८५ लाख, तर नदीतील जलपर्णी काढण्यासाठी ८५ लाखाचे टेंडर काढले आहे.
मलःनिसारण विभागाकडून याचे काम पाहिले जात असताना हे काम योग्य पद्धतीने झाले नाही. ठेकेदार पाण्यासोबत जलपर्णी वाहून येण्याची वाट पाहतात. त्यानंतर ही जलपर्णी एका ठिकाणी जमवून ती नदीबाहेर काढली जाते. त्यामुळे संपूर्ण नदीतील जलपर्णी काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मुठा, मुळा नदीमध्ये जलपर्णी अडकल्यानंतर तिची वाढ झपाट्याने होते. नदीचे पाणी मैलामिश्रित असल्याने जलपर्णी वाढण्यास पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जेथे जलपर्णी अडकते तेथे त्याची वाढ होऊन, नव्याने पाने फुटून बेट तयार झाल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे मुळा मुठा नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास होत आहे.
मुळामुठा नदीमध्ये जलपर्णी वाढल्यामुळे मंगळवार पेठ, कसबा पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ, नवी पेठ, यासह इतर भागातील नागरिकांना डासांचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात विविध ठिकाणी अडकलेली जलपर्णी काढून टाकावी, अशी तक्रार एप्रिल महिन्यात प्रशासनाकडे केली. पण अजूनही महापालिकेला जलपर्णी काढण्यासाठी वेळ मिळालेले नाही.
- विलास कांबळे, नागरिक, मंगळवार पेठ
नदी व तलावातील जलपर्णी काढण्यासाठी टेंडर काढले आहे. शहरात १० ते १२ ठिकाणी जलपर्णी काढली जाते. नदीच्या ज्या भागात जलपर्णी अडकली आहे व काढली जात नाही तेथे स्वतंत्र मशिन लावून जलपर्णी काढण्यास सांगितले जाईल.
- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी