Pune City Tendernama
पुणे

Pune: पुण्यात घरांच्या किमती वाढणार? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात पुणे शहरात रेडी रेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य दर - Ready Reckoner) दरात सरासरी ८ ते १५ टक्के, पिंपरी-चिंचवड शहरात १० ते १५ टक्के आणि ग्रामीण भागात ५ ते ७ टक्के वाढ प्रस्तावित केली असल्याचे समजते. रेडी रेकनरच्या या दरवाढीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते, त्यावर येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजे एक एप्रिलपासून रेडी-रेकनरच्या दरात वाढ होणार की आहे तेच दर राहणार हे ठरणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहे.

दर निश्‍चित करताना जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या आकडेवारीचा अभ्यास विभागाकडून करण्यात आला आहे. कोणत्या परिसरात वाढ दिसत आहे, याची मांडणीही करण्यात आली. त्यानुसार ही वाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबतचा अहवाल मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जाणार असल्याची माहिती मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामीण भागात येत्या काही वर्षात मोठे प्रकल्प येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुरंदरमध्ये प्रस्तावित विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, रेल्वे मार्ग, एमआयडीसी, महामार्गांचे रुंदीकरण, टाऊनशीप स्कीम आदी प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हे मोठे प्रकल्प, नव्याने येणाऱ्या कंपन्या यामुळे ग्रामीण भागात जमिनींचे दर वाढल्याचे सांगण्यात आले.

पुणे शहरातील रेडी रेकनरमधील वाढ
वर्ष - रेडी रेकनरमधील वाढ
२०१७-१८ - ३.६४ टक्के
२०१८-१९ - वाढ नाही
२०१९-२० - वाढ नाही
२०२०-२१ - १.२५ टक्के
२०२१-२२ - ५ टक्के
२०२२-२३ - ९.२ टक्के
२०२३-२४- ८ ते १५ टक्के (प्रस्तावित)