पुणे (Pune) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत रेल्वे फाटकांमुळे वाहतूक कोंडी होते. नागरीकांना अडकून पडावे लागते. ही फाटके कायमची बंद करावयाची असतील, तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसा प्रस्ताव सादर केल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने (MAHARAIL) म्हटले आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्रामध्ये रेल्वे ओव्हरब्रीज (ROB) उभारण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
महाराष्टृ राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याची योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. त्यासाठी १६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेतंर्गत राज्यभरात रेल्वे मार्ग ओलांडणी पूल उभारण्यात येत आहेत. त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील रेल्वे फाटके कायमस्वरूपी बंद करण्याची तयारी ‘महारेल’ने तयारी दर्शवली आहे. तसा प्रस्ताव स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिल्यास आमची तयारी असल्याचे ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी सांगितले.
अपघातमुक्त वाहतुकीसाठी...
पुणे विभागात ११२ रेल्वे फाटके आहेत. या मार्गांवरून दररोज धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे फाटक परिसरात वाहनांच्या रांगा लागून प्रचंड कोंडी होते. परिणामी, वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. याशिवाय रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक खालून ये-जा करतात. त्यामुळे अपघातांचा धोकाही उद्भवतो.
रेल्वे फाटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघातांना कायमचा ब्रेक लावण्यासाठी ‘महारेल’ने राज्यात विविध ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडणी पूल उभारले जात आहेत. पुणे जिल्ह्यातही अपघातमुक्त वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग ओलांडणी पूल उभारण्यास महारेल तयार आहे. तसे झाल्यास नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे विभागात ११२ रेल्वे फाटके
- पुणे जिल्ह्यातील लोणावळा, मिरज, सोलापूर लोहमार्गांवर
- पुणे शहरात घोरपडी येथे सोलापूर व मिरज लोहमार्गावर
- पिंपरी ते दापोडी रेल्वे स्थानकादरम्यान कासारवाडीत
- पुणे जिल्ह्यात वाल्हे-नीरा दरम्यान थोपटेवाडीत
- कामशेत-वडगाव स्थानकादरम्यान
केंद्र सरकारच्या सेतुबंधन योजनेतून, तसेच रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५०-५० टक्के निधीतून राज्यात हे पूल उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील रेल्वे फाटके कायमची बंद करण्यासाठी दोन्ही महापालिका व जिल्हा प्रशासनाने काम दिल्यास तिथे हे पूल उभारण्यात येतील.
- राजेशकुमार जयस्वाल, व्यवस्थापकीय संचालक, महारेल