PWD Tendernama
पुणे

Pune : पुणे जिल्ह्यातील रस्त्यावरील सर्व खड्डे 31 ऑगस्टपूर्वी बुजविले जाणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कामाला लागला असून, पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे युद्धपातळीवर बुजविले जात आहेत.

जिल्ह्यात एकूण ७ हजार १४ किलोमीटर लांबीचे रस्ते असून, यातील २ हजार ६८० किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाचा समावेश आहे. २६८० किलोमीटरच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदत दिली आहे. सतत पडणारा पाऊस व वेळेची मर्यादा यामुळे अवघ्या ११ दिवसांत २६८० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले जाणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

राज्य सरकारने १६ ऑगस्टला रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा आदेश काढला असून, ३१ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजविण्याची सूचना केली आहे. मात्र, पुण्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागात सातत्याने मोठा पाऊस होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करीत असले, तरीही पावसामुळे यात व्यत्यय येत आहे. शिवाय भरलेले खड्डेदेखील पुन्हा उखडले जात आहे.

खड्डे बुजविण्यासाठी काही ठिकाणी मुरमाचा, तर काही ठिकाणी डांबराचा वापर केला जात आहे. या तात्पुरत्या डागडुजीचा प्रभाव आणखी किती दिवस राहणार? हे पहावे लागणार आहे.

या मार्गांवर खड्डेच खड्डे

कोंढवा - बोपदेव - सासवड, बेल्हा - पाबळ - शिक्रापूर व लोहगाव - वाघोली - केसनंद हे तिन्ही राज्य मार्ग आहेत. यासह तालुके जिल्ह्याला जोडणारे व तालुके तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचाही यात समावेश आहे.

८७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

पुणे शहर व जिल्ह्यात २४६ प्रमुख जिल्हा मार्ग व ३४ राज्य मार्ग आहेत. राज्य मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे ८७ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

२०० किमी रस्त्याची पाहणी अनिवार्य

रस्ते खड्डेमुक्त व वाहतुकीकरिता सुस्थितीत ठेवण्याकरिता संबंधित मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी आठवड्यातील दोन दिवस पाहणी करावी, तसेच कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्येक आठवड्यात तीन दिवस पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात अभियंत्यांनी प्रत्येक दिवशी किमान २०० किलोमीटरचे रस्त्यांचे परीक्षण करणे अनिवार्य आहे. त्याचा अहवालदेखील शासनाला द्यावा लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील आमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाचा व्यत्यय येत आहे. ज्या भागात पाऊस नाही अशा भागात कामे वेगाने सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत सर्वच खड्डे बुजविले जातील.

- बप्पा बहिर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (मंडळ), पुणे