Vikram Kumar, PMC Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील 'त्या' नागरिकांची महापालिका का करणार पोलिसांत तक्रार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : समान पाणीपुरवठा योजनेचे काम रखडलेले असताना त्यात आता स्थानिक नागरिक मीटर बसविण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांविरोधात पोलिस कारवाई करण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेने २०१७ मध्ये समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. आतापर्यंत ६२ टक्के काम पूर्ण झालेले आहे. या योजनेतून ३ लाख १८ हजार पाणी मीटर बसविले जाणार आहेत. ज्या भागातील पाणीपुरवठा वितरणाच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे, अशा सोसायट्या, बंगल्यांना पाणी मीटर बसविण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत १ लाख ३४ हजार ५८० मीटर बसवून झाले आहेत.

सध्या मध्यवर्ती पेठा, सहकारनगर, पर्वती, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे आदी या भागात मीटर बसविले जात आहेत. मात्र पेठा व सहकारनगर, कात्रज भागांतील कामास स्थानिक राजकीय पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते विरोध करत आहेत. तसेच सोसायट्यांचे पदाधिकारीही विरोध करत आहेत.

त्याबाबत पाणीपुरवठा विभागाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला, तरीही विरोध कमी झालेला नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘‘समान पाणीपुरवठा योजनेचे ४० झोनचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तेथे मीटर बसविण्याचे कामे बाकी आहेत. पण काही नागरिक त्याला विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार करणार आहोत.’’