Pune Airport  Tendernama
पुणे

Pune : पुण्याहून दिल्लीला निघालेल्या 'त्या' विमानातील प्रवाशांना का बसला फटका?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणेकरांना विमानाने दिल्ली गाठण्यास सोमवारी (ता. १८) तब्बल ४ तासांचा उशीर झाला. पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान खराब हवामानामुळे जयपूर विमानतळावर उतरले. दुपारी दीडच्या सुमारास हे विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले. (Pune Airport Update)

सकाळी १० वाजता विमान दिल्लीला पोहचणे अपेक्षित असताना ४ तास उशिराने म्हणजे दुपारी २ वाजून २० मिनिटांनी दिल्लीला पोहचले. खराब हवामानाचा फटका प्रवाशांना बसला.

पुणे विमानतळावरून एअर इंडियाचे एआय-८५२ क्रमांकांचे विमान सोमवारी सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी उड्डाण केले. सकाळी १० वाजता दिल्ली विमानतळावर पोहचणे अपेक्षित होते. मात्र दिल्लीत धुक्याचे प्रमाण अधिक असल्याने हवाई नियंत्रण कक्षाने विमानाला दिल्ली विमानतळाऐवजी जयपूर विमानतळावर उतरण्याचा आदेश दिला. त्यानुसार हे विमान जयपूर विमानतळावर दाखल झाले.

जयपूर विमानतळावरून दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी विमानाने उड्डाण करून दिल्ली विमानतळावर दुपारी २ वाजून २० मिनिटांनी दाखल झाले. निर्धारित वेळेपेक्षा ४ तासांचा उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.