Pune Airport  Tendernama
पुणे

Pune : पुण्याहून मुंबईला अवघ्या 55 मिनिटांत पोहोचविणारी विमानसेवा का झाली बंद?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्याहून मुंबईला अवघ्या ५५ मिनिटांत पोहोचविणारी विमानसेवा बंद झाली आहे. पाच वर्षांनी मोठ्या प्रयत्नानंतर एअर इंडियाच्या (Air India) विमानाने २६ मार्च २०२३ला पहिले उड्डाण केले. त्यांनतर नियमित सेवा सुरू झाली. मात्र दरम्यानच्या काळात प्रवासीसंख्या नसल्याने एअर इंडियाने पुणे-मुंबईची सेवा बंद करून पुणे-बंगळूरची सेवा सुरू केली आहे. मुळात पुण्याहून मुंबईसाठीची उड्डाणाची वेळ ही चुकीची होती. परिणामी प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविले. अखेर एअर इंडियाने ही सेवा बंद केली.

पुणे-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासन मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत होते. मागच्या वर्षीच्या ‘विंटर शेड्यूल’मध्ये पुणे व मुंबई विमानतळावर स्लॉट राखीव ठेवला होता. मात्र त्या वेळी एअर इंडियाकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याने तो स्लॉट रद्द केला. त्यानंतर मागील वर्षीच्या ‘समर शेड्यूल’मध्ये पुणे व मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध केला. त्यानुसार २६ मार्चपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली होती.

अशी होती वेळ

- एआय ८४१ : मुंबईहून दररोज सकाळी ११ वाजून ०५ मिनिटांनी पुण्यासाठी उड्डाण. पुण्याला ११ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार

- एआय ८४२ : पुण्याहून मुंबईसाठी १२ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण, मुंबईला दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार

- फ्लाइंग टाइम ५५ मिनिटांचा

- यासाठी एटीआर-७२ या विमानाचा वापर

पहिली सेवा ‘एअर इंडिया’ची

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये पुणे-मुंबई-दिल्ली अशी दररोज विमानसेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर २०१७ रोजी जेट एअरवेज पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र तीदेखील सेवा काही कारणामुळे बंद झाली. त्यानंतर २०२३ मध्ये मुंबईसाठी सेवा सुरू झाली, मात्र काही महिन्यातच ही सेवा बंद झाली.

काय आहे कारणे?

- पुण्याहून दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी विमानाचे उड्डाण. ही वेळच मुळात चुकीची निवडली

- अर्धा दिवस संपल्यावर मुंबईत पोचत असल्याने कामे करण्यात अडचणी

- मुंबईहून बहुतांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे रात्रीची

- या उड्डाणासाठी पुण्यातील प्रवाशांचा पूर्ण दिवस वाया जातो

- त्यामुळे प्रवाशांकडून मुंबईला जाण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब

वेळ बदलणे गरजेचे

- विमान कंपन्यांनी पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाची वेळ बदलणे गरजेचे

- पूर्वीप्रमाणे सकाळी व रात्री मुंबईसाठी विमानसेवा सुरू केल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल

असा होईल फायदा

१. प्रवाशांना रस्ता वाहतुकीने प्रवास करावा लागणार नाही

२. अवघ्या ५५ मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होणार असल्याने प्रवासाच्या वेळेत मोठी बचत

३. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनांच्या संख्येत काही प्रमाणात तरी घट होईल

४. मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाने पुढचा प्रवास करणे सोपे जाईल

५. कार्गो सेवेला देखील चालना

पुणे-मुंबई विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभण्यासाठी सोयीची वेळ असणे गरजेचे आहे. सकाळी व रात्रीच्या सत्रातील वेळ निवडल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल. त्याचा फायदा अन्य घटकांना देखील होईल.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ