Bypass Road Tendernama
पुणे

Pune : कात्रज - देहूरोड बायपासवरील 'हा' भुयारी मार्ग का केला बंद?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयानजीकचा भुयारी मार्ग जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुनावळे येथील भुयारी मार्गावरील ताण वाढून वाहतूक कोंडीत भर पडल्याचे चित्र आहे. तेथील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल झाली आहे.

पुनावळे भागातून निगडी, चिंचवड व आकुर्डीकडे येण्यासाठी ताथवडे व पुनावळे या दोन भुयारी मार्गांचा मुख्यत्वे वापर केला जातो. पुनावळे, ताथवडे या भागात सुरू असणारी गृहसंकुलांची बांधकामांमुळे या भागातून दररोज बांधकामविषयक मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो यांची रहदारी सुरू असते. हे दोन्ही रस्ते अत्यंत अरुंद असून पावसामुळे खराब झाल्याने या भागात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. अशातच जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

यावर उपाय म्हणून या दोन्ही भुयारी मार्गांवर जड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय वाहतूक विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयाची सध्या ताथवडे भुयारी मार्गावरच अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे, या भागातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात दूर झाली असली तरी पुनावळे भुयारी मार्गावर मात्र अतिरिक्त वाहतुकीचा ताण पडत आहे. मात्र, केवळ वाहतुकीचे नियोजन करून उपयोग नाही; तर येथील खड्डेही बजवून रस्ता रुंदीकरण करणेही आवश्‍यक असल्याचे येथील रहिवाशांचे मत आहे.

पुनावळे भुयारी मार्गावर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामध्ये खासगी वाहने, स्कूल बसची संख्या मोठी आहे. सध्या मार्गावर जड वाहनांची गर्दी वाढल्याने येथून प्रवास करताना त्रास होत आहे. अरुंद रस्ते व पर्यायी मार्गांचा अभाव यामुळे अनेकदा तासनतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागते. त्यामुळे, वाहतूक नियोजनाबरोबरच येथील रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

- मयूर पाटील, रहिवासी

सध्या आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहाय्याने ताथवडे भुयारी मार्गावर बॅरिकेडस लावून जड व उंच वाहनांना प्रवेशास मनाई केली आहे. पुनावळे भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही तेथील भुयारी मार्गावर देखील लवकरच बॅरिकेडस लावण्यात येतील. जड वाहनांची वाहतूक समीर लॉन्स जवळून रावेत मार्गे वळवली जाईल.

- बापू बांगर, पोलिस उपायुक्त , वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड