private travels bus Tendernama
पुणे

Pune : यंदाच्या उन्हाळ्यात प्रवास का ठरतोय महागडा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यात पारा चाळीशीच्या पार गेल्यामुळे आधीच हैरान झालेल्यांना तिकीट दरवाढीने आणखीनच घाम फोडला आहे. उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या की प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. त्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाबरोबरच खासगी वाहतूकदारांकडूनही तिकीट दरवाढ केली जाते. यंदा विमान कंपन्यांच्या बरोबरीने खासगी ट्रॅव्हल्स चालकांनीही तिकीटदरात दुप्पट वाढ केल्याने त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसतो आहे. तिकीटदरांत भरमसाठ वाढ करून प्रवाशांची लूट सुरू असताना त्याकडे आरटीओकडून मात्र साफ दुर्लक्ष होताना दिसते आहे.

विमानांचे सध्या समर शेड्यूल सुरू आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी मार्चच्या सुरुवातीलाच तिकीटदरात वाढ केली. रेल्वेगाड्यांना देखील प्रचंड वेटिंग सुरू आहे. सुदैवाने अद्याप तरी राज्य परिवहन महामंडळाने आपली हंगामी दरवाढ केलेली नाही. असे असले तरी सामान्य प्रवासी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ट्रॅव्हल्सचालकांनी तिकीटदरात वाढ केली आहे. त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे.

नियम काय सांगतो?

राज्याच्या परिवहन विभागाने खासगी बसचालकांना (ट्रॅव्हल्स) एसटीच्या तिकीटदराच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर आकारण्यास मंजुरी दिली आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त दराची आकारणी होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार ‘आरटीओ’ प्रशासनाला आहेत. मात्र ‘आरटीओ’ला न जुमानता पुण्यातील ट्रॅव्हल्सचालक वाढीव दराची आकारणी करतात. दिवाळीत देखील तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली जाते. त्या वेळी ‘आरटीओ’ जुजबी कारवाई करते.

रेल्वेला वेटिंग, एसटी अपुरी

पुण्यातून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना मागील दोन महिन्यांपासूनच वेटिंग सुरू झाले. उत्तरेकडे जाणाऱ्या काही गाड्यांना तर ‘रिग्रेट’ सुरू आहे. त्यामुळे त्याचे वेटिंग तिकीटदेखील मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना ‘नो रूम’ आहे, तर दुसरीकडे राज्यात एसटीची संख्यादेखील कमी झाली आहे.

शिवाय महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, अमृत योजना यांसारख्या सवलतींवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे सामान्य प्रवासी नाइलाजास्तव ट्रॅव्हल्सकडे ओढला जातो. पुणे विभागात सध्या केवळ ८५० एसटी धावत आहेत.

मुंबई, पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे तिकीटदरात वाढ झाली आहे. असे असले तरीही आमच्या सदस्यांना सूचना दिली आहे. नियमापेक्षा अधिक दराची आकारणी करू नये, असे आवाहन केले आहे.

- बाबा शिंदे, अध्यक्ष, माल व प्रवासी वाहतूक संघटना, पुणे

खासगी बसचालकांना एसटीच्या तिकीटदरापेक्षा ५० टक्के इतक्या अधिक दराने तिकीट आकारण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त दराची आकारणी झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. प्रवाशांना जर आपल्याकडून अधिक रकमेची आकारणी केली जात आहे. असा अनुभव आल्यास प्रवाशांनी ‘आरटीओ’कडे तक्रार करावी.

- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे