Vikram Kumar, PMC Tendernama
पुणे

Pune : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात का सुरू आहे पळापळ?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात गेल्या तीन वर्षांत किती अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या, किती ठिकाणी कारवाई केली?, कारवाई न होण्याचे कारणे?, याबाबतचा अहवाल आयुक्त विक्रम कुमार यांना सादर करायचा असल्याने सध्या बांधकाम विभागात गडबड सुरू आहे. कनिष्ठ अभियंते इतर कामे बाजूला ठेवून नोटिसांची माहिती संकलित करून अहवाल तयार करण्याच्या कामास प्राधान्य देत आहेत.

आंबेगाव बुद्रूक येथे बांधकाम विभागाने ११ अनधिकृत इमारतींवर कारवाई केली. येथील इमारतींना २०२१ मध्येच नोटिसा बजावल्या होत्या, पण तेव्हा कारवाई झाली नाही. त्याच दरम्यान दोन वर्षांत अनेक नागरिकांनी तेथे फ्लॅट खरेदी केल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये एकाच दिवशी ५०० सदनिकांवर कारवाई केली. यात सामान्य नागरिकांचे नुकसान झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेतली, त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची समिती स्थापन केली असून, त्यांना गेल्या तीन वर्षांतील नोटिशींचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भातील पुढील बैठक १२ जानेवारीला होणार आहे. दरम्यान बिनवडे यांनी यासंदर्भात गुरुवारी आढावा बैठक घेऊन अहवाल सादर करण्यासंदर्भात सूचना केली आहे.