पुणे (Pune) : वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) स्मार्ट कार्डचे काम आता वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील तीन केंद्रावरून नव्या ठेकेदारांकडून (Contractor) रोज सुमारे ४५ हजार स्मार्टकार्डवर (Smart Card) छपाई सुरू आहे. मात्र आणखी दोन महिन्यांचा अनुशेष भरलेला नाही.
मे आणि जून महिन्यात जे उमेदवार वाहन परवान्यासाठी चाचणी देऊन उत्तीर्ण झाले, त्यांना अजूनही वाहन परवाना मिळालेला नाही. किमान १० हजार उमेदवार परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पुण्यासह राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयात वाहन परवाना व ‘आरसी’ संदर्भात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उमेदवारांना आपला वाहन परवाना मिळण्यासाठी महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत आहे.
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलचे राजू घाटोळे व विठ्ठल मेहता हे सातत्याने परिवहन विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. या संदर्भात परिवहन आयुक्त यांच्याकडे निवदेन देखील देण्यात आले आहे.