Traffic Jam Tendernama
पुणे

Pune : का वाढतेय पुण्यातील वाहतूक कोंडी? जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम असताना, महापालिका, राज्य सरकार मात्र विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित असूनही भूसंपादन न झालेल्या (मिसिंग लिंक) रस्त्यांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची सद्यःस्थिती आहे.

‘मिसिंग लिंक’मधील बहुतांश रस्त्यांसाठी आवश्‍यक भूसंपादनाची प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने हे रस्ते शहरासाठी नेमके केव्हा तयार होणार? त्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाल थंडावलेली असल्याने किमान राजकीय पातळीवर तरी ‘मिसींग लिंक’च्या प्रश्‍नासाठी काम होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी महापालिकेकडून विकास आराखड्यामध्ये रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. संबंधित रस्त्यांचे नियोजित मुदतीत भूसंपादन करून तेथे तत्काळ रस्ते करणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून या ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांच्या बांधणीकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे. महापालिका प्रशासनाकडून तत्काळ, मध्यम व दीर्घ अशा तीन टप्प्यांमध्ये या रस्त्यांचे काम करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

तत्काळ रस्त्याची कामे करण्याच्या टप्प्यामध्ये २८ ते २९ रस्त्यांचा समावेश आहे. त्यासाठी महापालिकेकडून निधीची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप भूसंपादन व अन्य तांत्रिक कारणांमुळे या रस्त्यांची कामे होत नसल्याची स्थिती आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये संबंधित रस्ते प्रस्तावित आहेत. परंतु अजूनही त्या रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन करण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासनाने संबंधित रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे. त्यानंतरही रस्त्यांच्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

त्यामुळे संबंधित रस्त्यासाठी भूसंपादन केव्हा होणार आणि प्रत्यक्षात संबंधित रस्त्यांची कामे केव्हा होणार, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. मिसिंग लिंक रस्ते तयार करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

मिसिंग लिंक रस्ते :

कोंढवा-महंमदवाडी रस्ता, वाघोली, वडगाव शेरी, विमाननगर, लोहगाव, बिबवेवाडी, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), बाणेर परिसर

रुंदीकरण न झालेले रस्ते :

नगर रस्ता, बाणेर रोड, मगरपट्टा, सोलापूर रस्त्यासह शहरातील अनेक मुख्य रस्त्याचे रुंदीकरण अद्याप झालेले नाही.

शहरातील रस्त्यांची सद्यःस्थिती

रस्त्यांची एकूण लांबी----------- २१०० किलोमीटर

विकास आराखड्यातील रस्ते-------१४०० किलोमीटर

रुंदीकरण पूर्ण झालेले रस्ते-------४२४ किलोमीटर

रुंदीकरण न झालेले रस्ते--------४१२ किलोमीटर

‘मिसिंग लिंक’ असलेले रस्ते-------४९१ किलोमीटर

मिसिंग लिंक रस्त्यांच्यासंदर्भात कामे सुरू आहेत. निधीसह अन्य तांत्रिक कारणांमुळे अनेक ठिकाणचे भूसंपादन बाकी आहे. तर भूसंपादन झालेल्या ठिकाणी रस्त्यांची कामे झालेली आहेत. उर्वरित कामांसाठी महापालिकेकडून तरतूद केलेली आहे.

- साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका