पुणे (Pune) : येथील गंधर्व हॉटेल समोरील चौकात होणारी वाहतूक कोंडी नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. इंधन, वेळ, पैसा सर्व काही खर्च होत असल्याने नाहक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.
गंधर्व चौकात तीन दिशेने वाहने येतात. महामार्गाकडून ग्रीनलँड काऊंटीच्या दिशेने येणारी वाहने, धायरीतील लाडली साडी सेंटरपासून महाराष्ट्र बँकेकडे येणारी वाहने आणि परांजपे अभिरुचीच्या बाजूने येणारी वाहने, अशी तीन बाजूंनी येणारी वाहने या चौकात अडकतात.
त्यातच जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे मुळातच छोटा असलेला रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. छोट्या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे, दुकाने, फेरीवाले, भाजीवाले इतर विक्रेते अस्ताव्यस्त लावलेल्या रिक्षा या सगळ्यामुळे वाहन चालवणे शक्य होत नाही.
ग्रीनलँड काऊंटीसमोर जाणारा नवले हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूचा रस्ता या वाहतूक कोंडीत अधिक भर घालतो. गणपती मंदिराच्या बाजूने येणारी वाहने देखील यात भर घालतात. बाजारपेठ तयार होताना दुकाने तयार करताना वाहतुकीचा कोणताही विचार या ठिकाणी केला गेला नाही.
स्थानिक आमदार, खासदार, इतर लोकप्रतिनिधी यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी थोडाही वेळ नाही. ग्रामपंचायत, महापालिका, पोलिस सर्व यंत्रणा सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत.
रोजच्या वाहतूक कोंडीला अतिशय कंटाळलो आहोत. दररोज किमान एक तास वाहतूक कोंडीत जातो. परिणामी आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
- योगेश कुलकर्णी, स्थानिक नागरिक