PMC Tendernama
पुणे

Pune: पुण्यातील नागरिकांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महानगरपालिकेला (PMC) धायरी गावाच्या डीपी रस्त्यांसाठी वारंवार पत्रव्यवहार झाला, आंदोलनाच्या माध्यमातून जागे करण्याचा प्रयत्न केला, तरीही प्रशासन कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. त्याच्या निषेधार्थ धायरी ग्रामस्थ आणि आम आदमी पक्षाच्या वतीने ४ जून रोजी धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात जन आक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे.

‘आप’चे धनंजय बेनकर यांनी सांगितले की, धायरीतील सावित्री मंगल कार्यालय डीपी रस्ता,  बेनकर नगरमधील सर्व्हे क्रमांक ६, ७ आणि ८ मधून ओढ्याला लागून जाणारा ६० फुटी प्रस्तावीत रस्ता, काका चव्हाण बंगला ते ड्रॅन कंपनी सर्व्हे नं. ३० मधून जाणारा श्री कंट्रोल चौक प्रस्तावीत मार्ग, हायब्लिस सोसायटी ते लक्ष्मी लॉज नऱ्हेगाव डीपी रस्ता हे चार रस्ते गेल्या २५ वर्षांपासून फक्त कागदावरच आहेत. भूसंपादन करून रस्ते तातडीने विकसित झाले पाहिजे.

श्री कंट्रोल चौक ते वेताळ बाबा चौक, भूमकर ब्रीज ते गायमुख ते दत्त नगर चौक शंभर फूट रुंदीचा रस्ता तातडीने अतिक्रमणमुक्त करण्याचीही नागरिकांची मागणी आहे. याबाबत
पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना लेखी पत्राद्वारे माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाकडून काहीही ठोस पावले उचलली जात नसल्याने जनआक्रोश आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.