PMC Pune Tendernama
पुणे

Pune : पेठा, गावठाणातील बांधकाम मंजुरीची प्रक्रिया का बनलीय किचकट?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मध्यवर्ती पेठांमध्ये व गावठाणात बांधकाम करताना साइड मार्जिनमध्ये सवलत दिली आहे. मात्र बांधकामाची फाइल दाखल झाल्यापासून ते अंतिम मान्यतेपर्यंत जवळपास २० टेबलांवर जाते. या प्रक्रियेत खूप वेळ जात असल्याने एकही फाइल मंजूर झालेली नाही. त्यामुळे बांधकाम मंजुरीची प्रक्रिया सुटसुटीत करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी मागणी केली. गावठाण आणि पेठांमध्ये बांधकाम करताना साइड मार्जिन सोडावे लागत होते. येथील जागेचा आकार कमी असल्याने साइड मार्जिनची अट शिथिल करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

अखेर सरकारच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी शुल्क आकारून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु बांधकाम विभागाने फाइल मंजुरीची प्रक्रिया किचकट केली आहे.

पेठ निरीक्षकाच्या सहाय्यकाकडून निवेदन लिहून घेणे, त्यावर बांधकाम निरीक्षक, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, नगर अभियंता यांची स्वाक्षरी घ्यावी लागते. त्यानंतर ती फाइल सावरकर भवन येथे आवक नोंदीसाठी पाठवली जाते. तेथून दक्षता विभागाकडे जाते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांची स्वाक्षरी झाल्यानंतर आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली जाते.

तेथे स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा याच पद्धतीने फाइलचा उलट प्रवास सुरू होतो. यामध्ये जवळपास २० टेबललंवर फाइल जाते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत आहे. आतापर्यंत एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करून क्लिष्टता कमी करावी, असे केसकर यांनी नमूद केले.