Mumbai Pune Expressway Tendernama
पुणे

Pune : मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करणाऱ्यांना का सहन करावा लागता मनस्ताप?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी किंवा गावी जाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरती मागची काही दिवस मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना करावा लागल्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना बसला.

मागील आठवड्याच्या अखेरीस सलग आलेल्या ३ सुट्ट्यांमुळे एक्स्प्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या मार्गावर अनेक वाहने बंद पडली होती. यामुळे शनिवार आणि रविवारी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी पुण्याकडे जाणारी वाहतूक रखडली होती. अडोशी टनेलच्या अगोदर पासून अमृताजन ब्रिज पर्यंत व पुण्याच्या दिशेला खंडाळ्याकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शनिवारी संध्याकाळपासूनच मार्गांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळ सण अशा तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. विशेषतः मुंबईतील पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे.

सुट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोरघाटात सुरू असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहनचालकांना शनिवारपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात पुणे लेनवर आडोशी बोगदा ते मॅजिक पॉइंट, टाटा कॅम्प, बोरघाट पोलिस चौकी दस्तुरी, अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा दरम्यान तीन ते चार किलोमीटर तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

खंडाळ्यात जुन्या महामार्गावर ड्युक्स हॉटेल ते राजमाची उद्यान दरम्यान वाहतूक विस्कळित झाली आहे. लोणावळ्यातही महामार्गावर मुनीर हॉटेल ते अपोलो गॅरेज दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्यावतीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नादुरुस्त वाहनांमुळे कोंडीत भर

बोरघाटात शनिवारी अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली. बोरघाटात जुनी अवजड वाहने गरम होतात. त्यामुळे गाड्यांचे क्लचप्लेट खराब होऊन, त्या बंद पडतात. दिवसभरात पंधरा-वीस गाड्या या पद्धतीने बंद पडत असतात. आजही असेच झाले. मात्र, सुट्ट्यांमुळे घाटात गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पर्यटनास तसेच गावी निघालेल्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसला. कोंडीमुळे नागरिकांना रस्त्यावर तासन्‌तास ताटकळत राहावे लागले. महिला आणि लहान मुलांचे खाण्या-पिण्यावाचून मोठे हाल झाले. खोपोली, खंडाळा येथील काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मदत करत बिस्किटे व पाण्यासह वाहने दुरुस्त करण्यासाठी मदत केली.