Indian Railway Tendernama
पुणे

Pune: 'त्या' 2 ठेकेदारांना रेल्वेने का दिला दणका?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रेल्वे (Railway) प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवाशांना ‘टार्गेट’ करणाऱ्या ठेकेदारांवर (Contractor) कारवाईचा बडगा उचलला आहे. प्रवाशांना लुटणाऱ्या खाद्य पदार्थ विक्रेते व दुसऱ्या शहरांत दुचाकी पाठविण्यासाठी दुचाकीला पॅकिंगसाठी नियमापेक्षा जास्तीचे पैसे घेणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली आहे.

खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना २५ हजार रुपये, तर दुचाकींचे पॅकिंग करणाऱ्याला ६ हजार रुपयांचा दंड केला आहे. ही कारवाई अशीच केली जाईल, अशी भूमिका वाणिज्य अधिकाऱ्यांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई रेल्वे प्रशासनाने ठेकेदारांवर केली होती.

पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांना मंगळवारी पुणे स्थानकाची पाहणी करताना त्यांना काही ठिकाणी उणिवा जाणवल्या. पुणे स्थानकाच्या परिसरात बाहेरच्या बाजूला असलेले स्टॉलधारक हे छापिल किमतीपेक्षा जास्त रक्कम प्रवाशांकडून आकारत होते. तसेच रेल्वे प्रशासनाने ज्या कंपनीच्या पाण्याच्या बाटलीला विक्रीस मज्जाव केला आहे, त्या कंपनीच्या बाटल्यांची विक्री केली जात होती.

या प्रकारच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. त्यांना २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर दुचाकीला रेल्वेच्या पार्सलने दुसऱ्या शहरात पाठविण्यापूर्वी पॅकिंग केले जाते. जेणेकरून प्रवासात काही तोड फोड होऊ नये.

एका दुचाकीला पॅकिंग करण्यासाठी ३४३ रुपयांचा दर रेल्वे प्रशासनाने ठरविला आहे. मात्र पॅकिंग करणाऱ्या ठेकेदारांच्या कामगारांनी ५०० ते ६०० रुपये प्रवाशांकडून घेतले. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतल्याने रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली.

प्रवाशांची फसवणूक होऊ नये म्हणून फलक लावण्यात आले आहेत. त्यावर सर्व सूचना दिल्या आहेत. ज्या प्रवाशांना आपल्याकडून जास्त रक्कम आकारली गेली असल्याचे लक्षात येते, त्यांनी स्थानकावर तक्रार द्यावी. अशा ठेकेदारावर अथवा स्टॉलधारकावर योग्य ती कारवाई केली जाईल.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे