Pune City Tendernama
पुणे

Pune: पुण्यातील 4 हॉटेल, 2 कंपन्यांवर पालिकेने का उगारला बडगा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) कर आकारणी व संकलन विभागाकडून थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या पथकाने नऱ्हे, आंबेगाव, धायरी, वडगाव परिसरातील २५ मिळकतींची प्रत्यक्षात पाहणी केली. त्यावेळी अनधिकृत बांधकामांसह महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल्स व दोन कंपन्यांवर पथकाने कारवाईचा बडगा उगारला.

कर आकारणी व संकलन विभागाकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निश्‍चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांकडून अधिकाधिक थकबाकी वसुल करण्यासाठी मिळकतींची प्रत्यक्षात पाहणी करण्यास सुरवात केली आहे.

त्यानुसार, महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांच्या पथकाने नऱ्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द या परिसरातील २५ मिळकतींना पथकाने प्रत्यक्षात भेटी दिल्या.

तपासणीवेळी अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकती, रुफ टॉप, साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन असलेल्या मिळकती शोधण्यात आल्या. त्यामध्ये थकबाकी असणाऱ्या काहींनी तत्काळ धनादेश दिल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. तर थकबाकी न भरणाऱ्यांच्या मिळकतींना टाळे ठोकण्यात आले.

कारवाई केलेल्या मिळकती
आंबेगावमधील हॉटेल वेदांतच्या फ्रंट मार्जिन व रुफ टॉपची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे त्यांच्याकडून तीन पटीने कर आकारण्यात आला. धायरी येथील केडीसी फूड वर्ल्डची ३१ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांच्या मिळकतीला टाळे ठोकण्यात आले.

धायरीतील ओके पॅकेजिंगचे १४०० चौरस फुटांचे अनधिकृत पत्र्याचे गोडाऊन असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांच्यावर २०१९ पासून अनधिकृत बांधकामाची तीन पटीने आकारणी करण्याचे आदेश देण्यात आला.

कारवाई टळलेल्या मिळकती
आंबेगाव बुद्रुकमधील हॉटेल विठ्ठल प्युअर व्हेज यांच्याकडे ३० लाख रुपयांची थकबाकी होती. त्यांच्या हॉटेलला टाळे ठोकण्याची कारवाई सुरू असताना त्यांनी तातडीने थकबाकी भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. धायरीतील हॉटेल निखारावर टाळे ठोकण्याची कारवाई सुरू असतानाच त्यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश महापालिकेस दिला.

नऱ्हे येथील त्रिमूर्ती इंजिनिअरिंग या कंपनीने २० हजार चौरस फुटांचे गोदाम उभारले होते, मात्र त्याचा कर भरलेला नव्हता. त्यांच्याकडून कर आकारणी करण्यात आली.