G-20 Pune Tendernama
पुणे

Pune : 'त्या' 2 हजार पुणेकरांवर पालिकेने का केली कारवाई? साडेचार लाखांचा दंड वसूल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, कचरा जाळणे तसेच लघुशंका करणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिका (PMC) प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे. या आठवड्यात दोन हजार जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

शहरात काही महिन्यांपूर्वी जी २० परिषदेअंतर्गत (G-20) विविध क्षेत्रांशी संबंधित तीन बैठका झाल्या. या तिन्ही बैठकांसाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता, सजावट करण्यात आली होती. विशेषतः शहरातील प्रमुख रस्ते, चौक, प्रमुख मार्गांवरील दुभाजकांची रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित रस्ते, चौक, दुभाजकांवर नागरिकांकडून थुंकण्याचे प्रकार सुरू होते.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे व कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र जी २० परिषदेअंतर्गतच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर महापालिकेची ही कारवाई थंडावली. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार वाढले आहेत.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिका प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्र करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार, एक ऑक्‍टोबरपासून शहरातील प्रमुख रस्ते, चौक, दुभाजक, बस, एसटी किंवा रेल्वेस्थानक अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या, नदीचा परिसर, पूल किंवा अन्य सार्वजनिक सर्रासपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

एक ते सात ऑक्‍टोबर या कालावधीत २०७८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. महापालिकेने त्यांच्याकडून सुमारे चार लाख ३२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंडात्मक कारवाई यापुढे कायम ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले.

१ ते ७ ऑक्‍टोबर कालावधीतील कारवाई
(अस्वच्छतेचे प्रकार....कारवाई केलेल्या व्यक्तींची संख्या....दंडात्मक रक्कम)
थुंकणे : १० : १० हजार
लघुशंका करणे : ०९ : १ हजार ८००
कचरा जाळणे : २५ : १२ हजार ५००
वर्गीकृत कचरा न देणे : ४३ : १४ हजार ५४०
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे : ८६० : ३ लाख ७ हजार ८६०
प्लॅस्टिक कारवाई : १४ : ७० हजार
अन्य : १११७ : १६ हजार २००
एकूण : २०७८ : ४ लाख ३२ हजार ९००

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, कचरा जाळणे यांसारख्या प्रकारामुळे शहरात अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे दंडात्मक कारवाईवर भर देण्यात आला आहे. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका