PMC Tendernama
पुणे

Pune : 'त्या' बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेने का केला 3 कोटींचा दंड?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : विना परवानगी रस्ते खोदाई केल्याची तक्रार केल्यानंतर महापालिकेने बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली. त्यानंतर बिल्डरकडून दंड वसूल करण्यासाठी महापालिकेला तब्बल एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने तीन कोटी १० लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

पुणे शहरात जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, गॅस वाहिनी, विद्युत वाहिनी, इंटरनेट केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. यामध्ये खासगी कंपन्यांकडून प्रती मीटर १२ हजार १९२ रुपये शुल्क घेतले जाते. शासकीय, निमशासकीय संस्थांना यामध्ये ५० टक्के सवलत दिली जाते तर महावितरणसाठी प्रती मीटर सुमारे दोन हजार ३०० रुपये इतका दर आहे.

खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ते खोदाई सुरू केली होती. त्याबाबत चौकशी केली असता या रस्त्यावर महापालिकेने परवानगी दिली नसल्याचे समोर आले, त्यामुळे भरत सुराणा यांनी यासंदर्भात पथ विभागाकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी मे २०२३ मध्ये केली होती.

महापालिकेने जुलै २०२३ मध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली. यामध्ये विना परवानगी ८५० मीटर लांबीचा रस्ता खोदल्याने तीन पट दंड आकारून तीन कोटी १० लाख रुपये भरण्याचे आदेश दिले होते. रक्कम गेल्याच आठवड्यात जमा झाली आहे. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर व रक्कम भरून घेण्यासाठी एक वर्ष पाठपुरावा करावा लागला, असे सुराणा यांनी सांगितले.

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, विना परवानगी रस्ता खोदल्याने बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली होती, त्यानुसार तीन पट दंडासह तीन कोटी १० लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.