Water Tunnel Tendernama
पुणे

Pune : 'त्या' वादग्रस्त कंपनीवर महापालिका पुन्हा का झाली मेहरबान?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कथित निवडणूक रोखे गैरव्यवहार प्रकरणातील मेघा इंजिनिअरिंग या वादग्रस्त कंपनीलाच रिंगरोडपाठोपाठ खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा पाणी प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ‘वर्क ऑर्डर’ही देण्यात आली.

हा बहुचर्चित प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले असले तरी यावरून वाद होण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाने तयार केली आहे.

या विभागानेच तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास मुख्य अभियंता आणि त्यांनतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता यापूर्वीच मिळाली. गेल्या महिन्यात राज्य सरकारकडून मान्यता मिळाली.

त्यानंतर या कामाची टेंडर प्रक्रिया जलसंपदा विभागाने तातडीने सुरू केली. टेंडर भरण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली. प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित असताना सुमारे १६०० कोटी रुपयांच्या टेंडर मागविण्यात आल्या.

त्यात मेघा इंजिनिअरिंग, नवयुग आणि एका कंपनीची भागीदारीतील अशा तीन टेंडर आल्या होत्या. त्यात मेघा इंजिनिअरिंग कंपनी पात्र ठरली. या कंपनीला आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच वर्क ऑर्डर दिल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या तीन टप्प्यांचे काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीला मिळाल्यावरून राजकीय वर्तुळात वाद सुरू आहे. त्यामुळे आताही वादाची शक्यता आहे.

काय आहे प्रकल्प

७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची असलेल्या ‘डी’ आकाराच्या बोगद्यातून खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याची ही योजना आहे. बोगदा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा असेल. यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येईल.

त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार आहे, तर अतिरिक्त तीन हजार ४७२ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.