Pune City Tendernama
पुणे

Pune : बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या 'त्या' वाहनांवर का केली RTO ने कारवाई?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) बेकायदेशीर वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने विविध वाहनांवर कारवाईला सुरवात केली. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या कारवाईनंतर रिक्षा वाहतुकीवर कारवाई केली जात आहे. विनापरवाना, विना बॅचची वाहतूक करणाऱ्या सुमारे ५४ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. यासाठी चार वायुवेग पथके नेमली आहेत. ते शहराच्या विविध भागांत फिरून कारवाई करीत आहेत.

पुण्यात गेल्या काही दिवसांत परमीट नसलेल्या रिक्षा मोठ्या प्रमाणात धावत आहेत. यात परजिल्ह्यातील रिक्षांचा समावेश आहे. दुसऱ्या जिल्ह्यांतील रिक्षांद्वारे प्रवासी वाहतूक होत आहे. यामुळे स्थानिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.

दुसऱ्या जिल्ह्यांत रिक्षा व्यवसाय करायचा असल्यास संबंधित रिक्षाचालकांकडे त्या शहरातील ‘आरटीओ’ कार्यालयाचे परमीट असणे आवश्यक आहे. काही रिक्षाचालक असे परमीट न काढताच पुण्यात रिक्षा व्यवसाय करीत असल्याची तक्रार काही रिक्षा संघटनांनी केली होती. बेकायदेशीर रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी ‘आरटीओ’ प्रशासनाला करण्यात आली होती.

ताडपत्री न घालणाऱ्या ८६ वाहनांवर कारवाई
बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या सुमारे ८६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाळू, विटा आदी बांधकाम साहित्याची वाहतूक करताना त्यावर ताडपत्री घालणे आवश्यक आहे. ताडपत्री नसल्याने वाळू, मातीचे कण रस्त्यांवर इतरत्र पसरून धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुणे ‘आरटीओ’ने ताडपत्री न घालता वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे.

बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांवर कारवाई केली जात आहे. यात रिक्षासह स्कूल बसचा देखील समावेश आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे