पुणे (Pune) : रेल्वे प्रशासनाने आरक्षित तिकीट काढण्याच्या कालावधीत पुन्हा बदल केला आहे. पूर्वी प्रवासाच्या तारखेच्या दिवसापासून १२० दिवस अगोदर आरक्षित तिकीट काढता येत होते. आता नव्या नियमांनुसार ६० दिवस अगोदर तिकीट काढता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू होईल.
दरम्यान ज्या प्रवाशांनी हा निर्णय लागू होण्यापूर्वी आरक्षित तिकीट काढले आहे, त्यांच्या तिकिटामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यांचे १२० दिवस आधीचे तिकीट असेल तरी ते प्रवास करू शकतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेताना कोणतेही कारण दिले नसले तरीही दलालांना चाप बसावा म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा दलाल आरक्षण केंद्रांवर जाऊन अथवा ऑनलाइन तिकिटाच्या माध्यमातून आरक्षित तिकिटाचा काळाबाजार करताना आढळले आहेत. त्यांना चाप बसावा म्हणून आरक्षण कालावधी कमी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कालावधी कमी केल्याचा परिणाम
१) दोन महिने अगोदर तिकीट काढावे लागणार आहे. त्यामुळे आरक्षण केंद्रावर झुंबड उडेल.
२) तिकीट कालावधी कमी झाल्याने प्रतीक्षेचे प्रमाण वाढण्याची शक्यता.
३) तिकीट रद्द करण्याचे प्रमाण कमी होणार. परिणामी प्रतीक्षेतील तिकीट निश्चित होण्याची शक्यता कमी होणार.
४) लांब पल्ल्यांच्या गाड्यांना आरक्षित तिकीट मिळण्यासाठी प्रवाशांची दमछाक होणार.
५) प्रवाशांना आरक्षित तिकीट न मिळाल्यास ‘तत्काळ’ तिकिटावर अवलंबून राहावे लागणार.
२००७ मध्ये होती ६० दिवसांची मर्यादा
रेल्वेमध्ये आरक्षित तिकीट काढण्याची मुदत सातत्याने बदलत गेली आहे. १ मार्च २००७ ते १४ जुलै २००७ या काळात ६० दिवस आधी तिकीट काढण्याची मुदत होती. २००७ नंतर पुन्हा १२० दिवसांची मुदत लागू करण्यात आली. यापूर्वी ४५ व ९० दिवसांची मर्यादा होती.