ST Tendernama
पुणे

Pune: राज्य परिवहनच्या पुणे विभागाने का मागविल्या अतिरिक्त गाड्या?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आषाढीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदाच्या वर्षी पुण्याहून पंढरपूरसाठी ४७५ एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. यात पुणे विभागाच्या २७५ तर अन्य विभागाच्या २०० गाड्यांचा समावेश आहे. २५ ते ३० जून दरम्यान या गाड्या पुणे - पंढरपूर - पुणे अशा धावतील.

आषाढीच्या काळात पुण्याहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. वारी संपल्यावरही वारकरी देखील मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. हे लक्षात घेऊन एसटी प्रशासन गाड्यांची संख्या वाढविते. यंदा एसटीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी असल्याने अन्य विभागांकडून अतिरिक्त गाड्या घेण्यात येत आहेत. पुणे विभागाच्या सर्वच आगारांतून पंढरपूरसाठी जादा वाहतूक केली जाईल.

मुंबई, रायगड, पालघर विभागातून जादा बस मागविण्यात आल्या आहेत. २५ जून रोजी २४ जादा गाड्या सोडण्यात येतील. त्यानंतर दररोज जादा गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. आषाढी एकादशीच्या दिवशी २७५ जादा बस जातील. शिवाजीनगर येथून २५ व स्वारगेट येथून ३० जादा बस धावतील. त्याबरोबरच बारामती (२७), इंदापूर (२८), सासवड (२१), शिरूर (२२) अशा जादा बस सोडल्या जातील.

प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून सुमारे गाड्या सोडण्याचे नियोजन झाले आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला तर गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाईल.
- सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे