पुणे (Pune) : कात्रज चौकातील वाहतूक कोणतेही पूर्वनियोजन न करता वळविण्यात आल्याने प्रचंड कोंडी झाली. परिणामी मंगळवारी (ता. १) सकाळी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मुख्य चौकातील मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुख्य चौकातील वाहतूक बंद करून ती नवले पुलाच्या बाजूने गर्डर टाकण्यात आलेल्या दोन पिलरच्या खालून वळविण्यात आली. त्यामुळे सातारा रस्त्यावर शंकर महाराज उड्डाणपूलापासून कात्रज घाटापर्यंत आणि नवलेपूलापासून कोंढवा रस्त्यावर सकाळी सहा वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी झाली होती.
मांगडेवाडी, संतोषनगर, कात्रजगाव, सच्चाईमाता परिसर, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द, दत्तनगरचौक, गुजर-निंबाळकरवाडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, नऱ्हेगाव अशा विविध भागांतील नागरिकांना याचा फटका बसला. परिसरातील लहान रस्त्यांपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळपासूनच विद्यार्थी, नोकरदार यांना इच्छित ठिकाणी वेळेवर पोहोचता आले नाही. अशा वेळी वाहतूक पोलिसांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघालो, मात्र वाहतूक कोंडीमुळे घरी परत यायला उशीर झालाच. शिवाय कार्यालयात वेळेवर पोहोचणे अशक्य झाले. प्रशासनाने योग्य नियोजन करून उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु करून पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे.
- योगेश हांडगे, स्थानिक नागरिक
उड्डाणपुलाचे काम हे मुख्य चौकात आले आहे. काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल केले, परंतु ते अयशस्वी झाले. सद्यःस्थितीत वाहतूक बदलाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असली तरी अन्य उपाययोजना तपासून पुढील निर्णय लवकरच घेऊ.
- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक