पुणे (Pune) : प्रवाशांना विविध तपासणीसाठी रांगेत थांबावे लागू नये म्हणून पुणे विमानतळ प्रशासनाने ‘डीजी यात्रा’ ही सुविधा सुरू केली. मात्र, तीन विमान कंपन्यांचे ‘डीजी यात्रा’शी एकीकरण (इंटिग्रेशन) न झाल्याने या विमान कंपन्यांच्या प्रवाशांना टर्मिनलवर प्रवेशापासून ते विविध तपासणीसाठी रांगेत थांबावे लागते. दिवाळीच्या सुटीनिमित्त विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी असताना संबंधित विमान कंपन्यांच्या हलगर्जीपणाचा फटका प्रवाशांना बसत आहे. शिवाय प्रवाशांच्या रांगा वाढत असल्याने त्याचा ताणही विमानतळ प्रशासन व ‘सीआयएसएफ’ यांच्यावर पडत आहे.
पुणे विमानतळावर डीजी यात्रा सुरू करण्यासाठी तब्बल एक वर्ष चाचणी घेण्यात आली. ३१ मार्च २०२३ पासून ही ॲप आधारित सेवा सुरू झाली. या सेवेमुळे प्रवाशांना ‘चेक-इन’साठी ओळखपत्र घेऊन रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. प्रवाशांना बोर्डिंग पाससह अन्य महत्त्वाची कागदपत्रे याच ॲपवर उपलब्ध होतात. त्यामुळे ते प्रत्यक्ष दाखविण्याची गरज नाही. शिवाय प्रवाशांचा ‘चेहऱ्या’ची नोंदही आधीच या ॲपमध्ये झाली असल्याने प्रवाशांचा चेहरा ‘बोर्डिंग पास’प्रमाणे काम करतो. यामुळे प्रवाशांच्या वेळीची बचत होते.
प्रवाशांची गैरसोय
पुणे विमानतळावरून सेवा देणाऱ्या काही विमान कंपन्यांनी याला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे इंटिग्रेशन ‘डीजी यात्रा’सोबत झाले आहे. मात्र, एअर एशिया, स्टार एअर व एअर अलायन्स या तीन विमान कंपन्यांनी ‘डीजी यात्रा’ला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या तीन विमान कंपन्यांच्या प्रवाशांना ‘डीजी यात्रा’चा फायदा घेता येत नाही. त्यांना रांगेत थांबूनच सर्व सोपस्कार पार पाडावे लागत आहेत.
विमानतळावरील असुविधा
- पुणे विमानतळावर प्रवाशांच्या माहितीसाठी लावण्यात आलेले फिड्स (उड्डाण माहिती प्रदर्शन प्रणाली) हे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांची माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.
- विमानतळ प्रशासन अचानक बोर्डिंग गेटच्या क्रमांकात बदल करीत आहे. त्यामुळे प्रवाशांची नाहक धावपळ होते.
- पुणे विमानतळाला सायलेंट विमानतळाचा दर्जा असल्याने उद्घोषणा होत नाहीत, तेव्हा प्रवाशांना विमानांबद्दल माहिती मिळण्यासही अडचण येते.
विमानतळावर वाढलेली प्रवाशांची गर्दी त्यातच ‘डीजी यात्रा’ची सुविधा मिळाली नसल्याची तक्रार विमानतळ प्रशासनाकडे केली आहे. शिवाय, पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरणाऱ्या बाबींविषयीही तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेऊन लवकरच कार्यवाही होण्याची आशा आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ