पुणे (Pune) : राजाराम पुलापासून ते शिवण्यापर्यंत अनेक ठिकाणी नदीच्या कडेने खासगी जागा मालकांनी हजारो ट्रक राडारोडा टाकून नदीपात्र कमी केले आहे. त्याचा फटका सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी भागातील नागरिकांना बसला आहे. आता पुणे महापालिका (PMC) प्रशासनाला जाग आली असून नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी दिवसभरात सुमारे २०० डंपर राडारोडा काढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
खडकवासला धरणातून ३५ हजार ५५६ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर वारजे, सिंहगड रस्ता, पुलाची वाडी, येरवडा, खिलारे वस्ती आदी भागांत पाणी घुसले. सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक फटका बसला असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जलसंपदा विभागाने जास्त पाणी सोडले यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पण त्याचसोबत नदीपात्रात राडारोडा टाकून पात्र अरुंद केल्यानेही पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
राजाराम पूल ते शिवणे दरम्यान मुठा नदीच्या पात्रात खासगी जागा मालकांनी हजारो ट्रक राडारोडा टाकून पात्र बुजविले आहे. त्या जागांवर व्यावसायिक वापर करण्याचा हेतू होता. यामध्ये प्रामुख्याने राजाराम पूल ते वारजे पूल दरम्यान जास्त राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यातून अनेक एकर जमीन निर्माण केली.
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर या राडारोड्यामुळे एकता नगरी भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या नाल्याचे पाणीही वस्तीमध्ये घुसले असे महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
वाघोलीत राडारोडा टाकणे आवश्यक
कर्वेनगर, शिवणे, कोंढवे धावडे आदी भागात नदीच्या कडेने राडारोडा टाकला आहे. आज तो राडारोडा नदीपात्रातून काढून जवळच असलेल्या खासगी जागेत टाकला जात आहे. महापालिकेचा वाघोली येथे सी अॅड ही प्रकल्प आहे. येथे राडारोडा नेऊन टाकणे आवश्यक आहे. त्यावर माधव जगताप म्हणाले,‘‘सध्या नदीपात्रातील राडारोडा काढण्याचे काम प्राधान्याने काढून तेथेच जवळच टाकला जात आहे. त्यानंतर तो वाघोलीतील खाणीत नेऊन टाकला जाईल.
एकतानगरी व परिसरातील अन्य कॉलनीमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी सोमवारपासून राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. त्याकामासाठी २५ जेसीबी आणि ५० डंपर जुंपण्यात आले आहेत. दिवसभरात २०० डंपर राडारोडा काढण्यात आला आहे.
- माधव जगताप, उपायुक्त, परिमंडळ तीन
खासगी मालकांनी टाकलेला राडारोडा पुणे महापालिका काढत असली तरी त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल केला जाणार आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका