ST Bus Stand - MSRTC Tendernama
पुणे

Pune: साहेब, आम्हाला न्याय कधी मिळणार? का आली आंदोलनाची वेळ?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्यासह पुणे विभागातील चालक व वाहक पदांसाठीची चार वर्षांपासून रखडलेली सरळ सेवा भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) शहर युवक काँग्रेसतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. सेव्हन लव्हज चौकातील एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांबाबत पुढील प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निवड यादी जाहीर करावी, प्रशिक्षण काळात गाड्यांची संख्या वाढवावी, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार एसटी महामंडळाने २०१९ मध्ये १२ विभागांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली. चालक व वाहक पदांसाठी राज्यात १६४७ जागा उपलब्ध होत्या.

यासाठी २९०० उमेदवार पात्र ठरले. पैकी २१५८ उमेदवारांची चाचणी झाली. मात्र उर्वरित ७४२ उमेदवारांची चाचणी झालीच नाही. परिणामी एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

पाच जुलैपासून प्रक्रिया
आंदोलनकर्त्यांनी पुणे विभागाचे प्रभारी विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर पाटील यांनी पाच जुलैपासून सरळ भरतीप्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले.