PMC Tendernama
पुणे

Pune: चांगल्या कामावर पाणी कोणी ओतले? पालिकेने की मेट्रोने?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : G-20 समूहाच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केल्यानंतर पुणे महापालिकेच्या (PMC) प्रशासनानेच त्यावर पाणी ओतले आहे. सुशोभीकरण केलेल्या दुभाजकांमध्येच रस्त्याचा राडारोडा, चेंबरची झाकणे टाकून विद्रुपीकरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हा प्रकार मेट्रोने केल्याचा महापालिकेचा आरोप आहे. मेट्रोने तो खोडून लावला आहे. महापालिका व मेट्रो टोलवाटोलवी करीत असले तरी राडारोडा नेमका कुणी टाकला, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे.

G-20च्या शिक्षण कार्यगटाची बैठक संपून जेमतेम ४८ तास उलटले आहेत. कर्वे रस्त्यावरील दुभाजक आणखी विद्रूप दिसू लागले. उज्ज्वल केसकर यांनी हा प्रकार ट्‌विट करून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र त्यावर कुठलीही कारवाई करण्याचे कष्ट प्रशासनाने अद्याप घेतलेले नाहीत.

जी-२० समूहाच्या आतापर्यंतच्या तिन्ही बैठकांसाठी शहर सुशोभिकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. विविध देशांचे प्रतिनिधी, मंत्री पुण्यात येणार असल्याने रस्ते चकाचक करणे, खड्डे बुजविणे, भिंती रंगविण्यापासून, रस्त्यांभोवती, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. त्याचबरोबर शहरातील विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांकडून सुशोभिकरण करून देण्याची मागणी महापालिकेकडून केली जाते. त्यानुसार, उद्योग, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदारांसह काही संस्था पुढे येऊन सुशोभीकरण करतात.

शहरातील कर्वे रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशाला ते आयुर्वेद रसशाळा व तेथून पुढे नळस्टॉपपर्यंतच्या दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे (फ्लॉवर बेड) लावण्यासाठी व्यावसायिक पंडित जावडेकर यांनी पुढाकार घेतला.

सुशोभीकरण केलेल्या दुभाजकाच्या ठिकाणी महापालिकेने राडारोडा टाकलेला नाही. मेट्रो प्रशासनाने तो टाकला आहे.

- व्ही. जी. कुलकर्णी, महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे एका वर्षापूर्वीच मेट्रोचे उद्घाटन झाले. त्याठिकाणी मेट्रोचे आता कुठलेही काम नाही. जर आम्ही राडारोडा निर्माणच करीत नसू तर तो टाकण्याचा प्रश्‍न येतो कुठे?

- हेमंत सोनवणे, मेट्रोचे सरव्यवस्थापक

जी २० च्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरण केलेल्या दुभाजकावरील झाडांवर राडारोडा टाकला जात आहे. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. यासंबंधी दोषी असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हायला पाहिजे.

- प्रशांत बधे, माजी नगरसेवक