PMC Tendernama
पुणे

Pune : पुणे महापालिकेला सुट्टी असतानाही उड्डाणपुलाच्या कामाची वर्कऑर्डर निघालीच कशी?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागणार असल्याने निवडणुकीत राजकीय पक्षांना श्रेय लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक सुट्टीनिमित्त महापालिका बंद असतानाही विश्रांतवाडी आणि घोरपडी येथील उड्डाणपुलाच्या टेंडरला स्थायी समितीची मान्यता नसतानाही कार्याआदेश (वर्कऑर्डर) देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन उरकल्याचा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेतर्फे विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथे उड्डाणपूल आणि समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधले जाणार आहे. तर घोरपडी येथे पुणे मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या कामासाठी १०९ कोटी १५ लाख रुपयांचे खर्च अपेक्षीत होता.

टेंडर प्रक्रियेत मे. एस. एम. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने ९५ कोटी २१ लाख ९९ हजार ५७४ इतक्या खर्चात हे काम करण्याची तयारी दर्शविल्याने हे टेंडर अंतिम केले आहे. या टेंडरला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर कार्याआदेश देणे आवश्‍यक होते. मात्र, या नियमाला केराची टोपली दाखवत प्रकल्प विभागाने राजकीय दबावापोटी थेट कार्यादेश दिले.

घोरपडी येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वारजे येथील कार्यक्रमात ऑनलाइन करण्यात आले. तर विश्रांतवाडी येथील उड्डाणपूल व समलत विगलक या प्रकल्पाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यासाठी महापालिकेत दोन दिवसांत अतिशय वेगाने या कामाची फाइल प्रकल्प विभागापासून ते आयुक्त कार्यालयापर्यंत फिरविण्यात आली. पण स्थायी समितीची बैठक गुरुवारी (ता. १४) तारखेला होणार असल्याने आयुक्तांच्या अधिकारात महाशिवरात्रीनिमित्ताने महापालिकेला सुट्टी असतानाही मान्यता देण्यात आली.

प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याच दिवशी स्वाक्षरी करून कार्यादेश काढले आहेत. या निविदेचा हा प्रस्ताव आत स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये निर्णयामध्ये नियमांचे पालन झाले की नाही याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टोलवाटोलवी केली.