COEP Flyover Tendernama
पुणे

Pune : टेंडर मिळविण्यासाठी खोटा दाखला सादर करणारा 'तो' ठेकेदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठ (COEP Technical University) चौकातील उड्डाणपुलाला ध्वनिरोधक (साउंड बॅरियर्स) लावण्याच्या कामाचे टेंडर (Tender) मिळविण्यासाठी मुंबईतील एका हॉटेलचा खोटा दाखला मिळविण्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर महापालिकेच्या (PMC) प्रकल्प विभागाने टेंडर रद्द करून ठेकेदाराला (Contractor) काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामुळे या कामाला अजूनही मुहूर्त लागलेला नाही.

मे. द. रायकॉन कन्स्ट्रक्शन असे काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी यासंदर्भात आदेश दिला आहे. पुणे महापालिकेने ‘सीओईपी’ चौकात उड्डाणपूल बांधल्यानंतर या संस्थेतील विद्यार्थ्यांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी साउंड बॅरियर्स लावण्याची मागणी ‘सीओईपी’तर्फे करण्यात येत होती.

खोटा दाखला देण्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रकल्प विभागाने हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. यामध्ये महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याने विधी विभागाच्या सल्ल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच संबंधित हॉटेल कंपनीनेदेखील ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी कार्यालयीन परिपत्रक काढत मे. द. रायकॉन कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायालयात दाद मागणार

मे. द. रायकॉन कन्स्ट्रक्शनचे प्रमुख शक्ती दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, महापालिकेच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

- साउंड बॅरियर्ससाठी महापालिकेकडून अर्थसंकल्पात तरतूद

- त्यानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये सुमारे तीन कोटी २० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले

- यामध्ये द. रायकॉन कन्स्ट्रक्शनने टेंडर भरताना अनुभवाचा दाखला म्हणून मुंबईतील एका हॉटेलचे पत्र जोडले

- टेंडरचे ‘अ’ पाकीट उघडल्यानंतर या पत्राबाबत महापालिकेला संशय आल्याने संबंधित हॉटेलशी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्षात भेट घेऊन माहिती घेतली

- हॉटेलच्या कंपनीने ठेकेदाराला कोणतेही पत्र दिलेले नाही. तसे पत्रही महापालिकेला दिले

- यानंतरही संबंधित ठेकेदाराने महापालिकेला आणखी एक खोटे पत्र देऊन पूर्वीचा दाखला कसा खरा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला

- त्याचीही खातरजमा करण्यात आल्यानंतर हे पत्रही खोटे असल्याचे समोर आले

वारंवार घडत आहेत प्रकार!

महापालिकेचे काम मिळविण्यासाठी ठेकेदारांकडून खोटी कागदपत्रे सादर करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यापूर्वी जी-२० च्या विविध कामांच्या टेंडर, येरवडा येथील नदीवरील पुलाच्या कामाचे टेंडर, सॅनिटरी पॅड पुरविण्याचे टेंडर, संगणक खरेदी यासह इतर कामांच्या टेंडकमध्ये खोटी कागदपत्रे दिल्याने समोर आले आहे. यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठेकेदारांना यासाठी मदत करत आहेत. असे प्रकार लहान-मोठ्या टेंडरमध्ये घडत असल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे, तसेच कामांचा खोळंबाही होत आहे.