PMC Pune Tendernama
पुणे

Pune: टेंडरच्या गोंधळात कोण करतेय खेळाडूंची आबाळ?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) कोट्यवधी रुपये खर्च करून सणस मैदानावर जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅकसह इतर सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याची देखभाल कशी व कोणी करावी, ट्रॅक खराब झाल्यास जबाबदारी कोणाची, या प्रशासकीय गोंधळामुळे खेळाडूंना येथे खेळता येत नव्हते. अखेर सोमवारी (ता. ३) खेळाडू व पालकांनी आंदोलनाचा इशारा देताच महापालिकेने हे मैदान खुले केले आहे.

पुणे शहरातील खेळाडूंना सरावासाठी महापालिकेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून सणस मैदानावर सिंथेटिक ट्रॅक तयार केला आहे. या मैदानावर धावण्यासह इतर खेळांची सुविधा आहे. मात्र, त्याची देखभाल-दुरुस्ती करणे महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी या ट्रॅकवर ‘पीएमपी’च्या बस उभ्या करून लोकार्पणाचा कार्यक्रमही झाला.

मैदानावर खेळाडूंना नियमित सराव करता यावा, यासाठी मैदान खुले करावे, अशी मागणी काही महिन्यांपासून केली जात होती. परंतु, प्रशासनाकडून त्यासंदर्भात निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे सोमवारी दुपारी मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा खेळाडू व पालकांनी दिला होता. त्यास भाजपनेही पाठिंबा देत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन गेट खुले करण्याची मागणी केली. आम आदमी पक्षानेही खेळाडूंसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याची दखल घेऊन प्रशासनाने दुपारी मैदान खुले केले आहे.

सणस मैदानावरील सिंथेटिक ट्रॅकची काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी टेंडर काढून संस्था नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तोपर्यंत महापालिकेचे सुरक्षारक्षक नियुक्त करून हे मैदान खेळाडूंसाठी खुले केले आहे.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका