tanker pune Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील टँकरमाफियांच्या वाढत्या दहशतीला जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिका (PMC) ३४ समाविष्ट गावांमध्ये नळाने पाणी देत नाही, तसेच टँकरने केला जाणारा पाणीपुरवठाही तेथील रहिवाशांना अपुरा पडतो. परिणामी समाविष्ट गावांमधील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना खासगी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते आणि त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. या पार्श्वभूमीवर या गावांमधील सोसायट्यांमुळे टँकरमाफियांची चांदी होत आहे.

समाविष्ट ३४ पैकी २४ गावांत एका दिवसात महापालिकेच्या टँकरच्या केवळ ७७९ फेऱ्या होतात. या गावांचा भार सोसत नसल्याने महापालिकेला पाणी देता नाही. त्याशिवाय टँकरची सोयही अपुरी पडते. त्यामुळे टँकरमाफियांना मोकळीक मिळते.

राज्य सरकारने २०१७ मध्ये ११ आणि २०२१ मध्ये २३ अशा ३४ गावांची जबाबदारी महापालिकेवर टाकली. शहराच्या हद्दीपासून पाच किलोमीटरपर्यंतच्या गावांना महापालिकेनेच पाणीपुरवठा केला पाहिजे, असा शासनाचा नियम आहे. असे असले तरी या भागांत महापालिकेची पाणीपुरवठ्याची यंत्रणा नाही. त्या कामासाठी पुढील पाच ते सहा वर्षे लागणार असली तरी समाविष्ट गावांमध्ये मोठी गृहसंकूले उभी राहात आहेत. तेथे टँकरने पाणी मागविणे भाग पडते.

महापालिकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) आणल्याशिवाय बांधकाम परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जुलै महिन्यात घेतला होता, पण समाविष्ट गावांत पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे सांगत एका महिन्यात हा आदेश मागे घेण्यात आला.

महापालिकेने पाणीपुरवठा प्रकल्प सुरु होईपर्यंत गावांमध्ये मोफत टँकर उपलब्ध करून दिले, पण त्यांची संख्या अपुरी असल्याने सोसायट्यांची पूर्ण तहान भागत नाही.

पाणी पुरवठा विभागाने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार समाविष्ट ३४ गावांपैकी १० गावांत टँकर पुरविले जात नाहीत. उर्वरित २४ पैकी फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री, आंबेगाव बुद्रूक, सूस, आंबेगाव खुर्द, धायरी या गावांत टँकरच्या सर्वाधिक फेऱ्या होतात.

या गावांत पालिकेचे टँकर नाहीत

बावधन बुद्रूक, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, वाघोली, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नऱ्हे, नांदोशी, सणसनगर

महापालिकेची सुविधा

गाव - टँकरच्या फेऱ्या

म्हाळुंगे - २५

सूस - ४५

शिवणे-उत्तमनगर -५

लोहगाव - २२

मांजरी बु. - ३५

शेवाळेवाडी - ४२

केशवनगर - २०

साडेसतरानळी - १७

होळकरवाडी - १८

फुरसुंगी - १००

उरुळी देवाची - ९५

औताडे हांडेवाडी - १६

गुजर निंबाळकरवाडी - १०

मांगडेवाडी - १०

उंड्री - १००

पिसोळी - ३५

वडाची वाडी ६

धायरी -३५

आंबेगाव बु. - ९५

आंबेगाव खु. - ४०

भिलारेवाडी - ५

कोळेवाडी -२

जांभूळवाडी - १

टँकरच्या सुमारे हजार फेऱ्या

समाविष्ट गावांमध्ये खासगी टँकरच्या रोज किमान एक हजार फेऱ्या होतात. त्याची तपशीलवार माहिती उपलब्ध नसली तरी हा अंदाज पाणीपुरवठा विभागाकडूनच वर्तविण्यात आला आहे. ५०-६० फ्लॅटच्या सोसायट्यांना दिवसाला किमान ५ ते ६ टँकर घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना प्रत्येकी ८०० ते एक हजार रुपये मोजावे लागतात.

२००-३०० किंवा त्यापेक्षा जास्त फ्लॅटच्या सोसायट्यांना किमान १५ ते ३० टँकर मागवावे लागतात. या सोसायट्यांना पाण्यासाठी महिन्याला दोन लाखांपासून ते १०-१२ लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. काही सोसायट्यांनी तर थेट विहिरीच भाड्याने घेतल्या असून तेथून पाणी पुरविले जाते.

महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे काम पूर्ण होईपर्यंत समाविष्ट गावांमध्ये टँकरद्वारे पाणी दिले जाते. सध्या टँकरच्या रोज ७७९ फेऱ्या होत आहेत. मागणीनुसार फेऱ्यांची संख्या वाढविली जाते.

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा

आमच्याकडे महापालिकेचे पाणी येत नाही. त्यामुळे सोसायटीकडून रोज किमान सहा टँकर मागविले जातात. आमची सोसायटी त्यासाठी महिन्याला सुमारे दोन लाख रुपये खर्च करीत आहे. जो स्वस्तात टँकर देतो त्याला टँकर माफिया पाणी विकू देत नाहीत.

- सोनाली देशमुख, म्हाळुंगे