पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी राज्य सरकारकडून निधी आला असला तरी भूसंपादन अतिशय धिम्यागतीने सुरू आहे.
महापालिकेने नुकतीच भूषण सोसायटी येथील ८३५ चौरस मीटरची जागा ताब्यात घेतली. यामुळे विस्तारित उड्डाणपूल उतरणार आहे तेथे सेवा रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.
महापालिकेने भूसंपादन न करता कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची शेकडो कोटी रुपयांचे टेंडर काढले. पण जागा ताब्यात नसल्याने हा प्रकल्प पाच वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्यासाठी ९४ हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ आठ हजार २५० चौरस फूट मीटर जागा ताब्यात आली आहे. तर ६२ हजार चौरस मीटरची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे, पण त्यासाठी ३७५ कोटींची गरज असल्याने हे काम ठप्प झाले होते.
या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने १३९ कोटी रुपये निधी दिला. महापालिकेच्या अर्थसंकल्पात ७४ कोटींची तरतूद आहे. तरीही भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती आलेली नाही.
अनेक प्रयत्न केल्यानंतर भूषण सोसायटी येथील जागा ताब्यात घेण्यास मान्यता मिळाली आहे. त्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे. दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाचा वेग वाढविण्यासाठी जागा मालकांशी चर्चा सुरु आहे. आगामी काळात आणखी जागा ताब्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.