पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, नांदोशीसह सणसनगर आणि नांदेड सिटी टाऊनशिप या गावांचा ३० जून २०२१ रोजी महापालिकेत समावेश झाला. परिणामी या भागातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. परंतु, ही गावे अद्याप ग्रामीण पोलिस दलात आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयात अद्याप समावेश झाला नाही. त्यासाठी नांदेड सिटी पोलिस ठाणे कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, नांदोशीसह सणसनगर आणि नांदेड सिटी टाऊनशिप असणारा परिसर सध्या हवेली पोलिस ठाण्याच्या अंतर्गत म्हणजे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या अंतर्गत आहे.
हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सध्या खडकवासला, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, सणसनगर, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, गोळेवाडी, पायगुडेवाडी, घेरा सिंहगड, खरमरी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, आतकरवाडी, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, मालखेड, वसवेवाडी, वरदाडे, खामगाव मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, सोनापूर, आंबी, मांडवी खुर्द, आगळंबे या गावांचा समावेश आहे.
यातून खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर आणि नांदेड सिटी टाऊनशिप ही गावे वगळून नांदेड सिटी पोलिस ठाण्यात समाविष्ट होणार आहे. उर्वरित गावे हवेलीत राहतील.
दरम्यान, खेड, शिवापूर, श्रीरामनगर, गोगलवाडी, रहाटवडे, कल्याण, गाऊडदरा, आर्वी, सणसनगर, कोंढणपूर, अवसरेवाडी, मोरदरवाडी ही गावे हवेली तालुक्यातील आहे. काही वर्षांपूर्वी ही गावे हवेली पोलिस ठाण्यातून राजगड पोलिस ठाण्याला जोडली होती. आता ही गावे पुन्हा हवेली पोलिस ठाण्याला जोडण्याची मागणी होत आहे.
खडकवासला धरणाच्या उत्तरेकडील बाजूची सर्व गावे पुणे शहर आयुक्तालयातील उत्तमनगर पोलिस ठाण्यात आहेत. परंतु, यापैकी तांत्रिकदृष्ट्या आगळंबे आणि मांडवी बुद्रुक अद्याप हवेली पोलिस ठाण्यात आहेत. प्रत्यक्षात ही गावे उत्तमनगर पोलिस ठाण्यामध्ये समाविष्ट असली पाहिजेत.
तत्कालीन पोलिस आयुक्तांकडून जागेची पाहणी
नांदेड सिटी पोलिस ठाणे उभारण्यासाठीचा पहिला टप्पा जानेवारी २०२१ मध्ये झाला. या वेळी तत्कालीन शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जागेची पाहणी केली होती. नांदेड सिटीमधील १८ हजार चौरस फूट जागा या टाऊनशिपच्या माध्यमातून पोलिस ठाण्यासाठी देण्यात येणार आहे. ही जागा ९९ वर्षाच्या कराराने असणार आहे.
याठिकाणी टाऊनशिपच्या उभारणीत पोलिस ठाणे बांधून देण्याची जबाबदारी विकासकाकडे असते. त्यानुसार नांदेड सिटी पोलिस ठाणे लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.