PMP Tendernama
पुणे

Pune: PMPच्या 'या' नव्या प्रयोगाला पुणेकर कधी प्रतिसाद देणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रवाशांना अवघ्या ५०० रुपयांत शहराच्या जवळच्या ठिकाणांना भेट देता यावी म्हणून पीएमपी (PMPML) प्रशासनाने पर्यटन बससेवा सुरू केली आहे. सध्या सातपैकी दोन मार्गांवर ही सेवा सुरू आहे.

पीएमपीची सातही मार्गावर सेवा देण्याची तयारी आहे. मात्र, गेल्या रविवारी हडपसर-सासवडमार्गे जाणारी पर्यटन बस क्रमांक दोनची फेरी प्रवाशांअभावी रद्द करावी लागली. त्यामुळे या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळणे गरजेचे झाले आहे.

पीएमपी प्रशासनाने वेगवेगळ्या मार्गांवरील पर्यटन व तीर्थस्थळांना जाण्यासाठी सात मार्गांवर सेवा देण्याची तयारी केली. यापैकी दोन मार्गांवर सेवा सुरु झाली आहे. ही सेवा दर शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशी उपलब्ध राहणार आहे. मात्र त्यासाठी किमान २० प्रवाशांचे बुकिंग झाले पाहिजेत.

गेल्या रविवारी (ता. २१) हडपसरहून सुटणारी सासवडमार्गे सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकावळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर आदी स्थळांना भेट देणाऱ्या बसला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ऐनवेळी रविवारची फेरी रद्द करावी लागली.

उद्‍घाटनालाच प्रतिसाद
१४ मे रोजी पर्यटन बस क्रमांक २ चे उद्‍घाटन झाले. त्यावेळी पहिल्याच दिवशी सुमारे २९ प्रवाशांनी प्रवास केला तर २१ मे रोजी पर्यटन बस क्रमांक ४ या धरणांची सफर घडविणाऱ्या बस सेवेचे उद्‍घाटन झाले. त्याचदिवशी सुमारे ३१ प्रवाशांनी प्रवास केला. पीएमपी प्रशासनाने शनिवार व रविवारी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पर्यटन बस क्रमांक दोनच्या शनिवार व रविवारच्या दोन्ही फेऱ्या प्रवाशांअभावी रद्द कराव्या लागल्या.

या मार्गावर बस सुरू करण्याचा निर्णय
बस क्र. १ : हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर
बस क्र. ३ : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन
बस क्र. ५ : पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन
बस क्र. ६ : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधिमंदिर (वढू बुद्रूक), रांजणगाव गणपती, पुणे स्टेशन
बस क्र. ७ ः भक्ती-शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती-शक्ती निगडी

पीएमपी प्रशासनाने दोन मार्गांवर माफक दरात पर्यटन बससेवा सुरू केली आहे. मात्र, तिला प्रवाशांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. ग्रुप बुकिंग असल्यावर त्यात सवलत दिली जाणार आहे.
- प्रज्ञा पवार, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल


पीएमपीने सुरू केलेली पर्यटन बस ही खरोखरच खूप चांगली आहे. प्रवाशांना माफक दरात ही सेवा उपलब्ध आहे. पीएमपी प्रशासनाने निवडलेली ठिकाणेही खूप चांगली आहेत. या सेवेला प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.
- अपेक्षा भोसले, प्रवासी