Khadki Tendernama
पुणे

Pune : खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेत कधी समाविष्ट होणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) खडकी कॅन्टोन्मेंटचा (Khadki Cantonment Board) नागरी भाग समाविष्ट करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी व महापालिका आयुक्त यांची बैठक झाली. बोर्डाकडून महापालिकेला आराखडा देण्यात आला आहे, तर पुणे कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांशी महापालिका प्रशासनाकडून अजून चर्चा सुरू आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरी भाग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाविष्ट करण्याचे पत्र काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठविले होते. तसेच आवश्‍यक माहितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारने महापालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीतील खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मागील महिन्यात बैठक बोलावली होती. त्या वेळी आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झाली.

दरम्यान, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन पुन्हा चर्चा केली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासंबंधी माहिती, आराखडा दिला. त्याचवेळी महापालिकेकडून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा सुरू आहे.

याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी बुधवारी आले होते. त्यांनी त्यांचा आराखडा महापालिकेकडे दिला आहे. पुणे कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र त्यांचा आराखडा अजून आलेला नाही.