पुणे (Pune) : महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यात आला असून, पुणे परिमंडलात २५३.९४ मेगावॅट क्षमतेचे १० हजार १७० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक व सोसायटीच्या घरगुती ७ हजार ५८० ग्राहकांकडील ७२ मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचा समावेश आहे. तर ९६.७९ मेगावॅट क्षमतेचे आणखी ३ हजार ५८० प्रकल्पांचे काम सुरू आहे.
सध्या गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच निवडसूचीवरील ‘सौर’च्या ४५ एजन्सीच्या प्रतिनिधींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोबतच सर्व ४१ उपविभाग कार्यालयांतील सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) आणि ‘सौर’ एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा नुकतीच झाली.
घरगुती ग्राहकांसाठी अनुदान
- १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के
- ३ ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के
अनुदानाचा फायदा कसा?
उदा. ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी सुमारे १ लाख २४ हजार रुपये खर्च. त्यात ४० टक्के अनुदानाप्रमाणे सुमारे ४९ हजार ६०० रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य. यामुळे संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात सुमारे ७४ हजार ४०० रुपयांचा खर्च.
प्रकल्पांमुळे घरगुती वैयक्तिक व सोसायट्यांच्या वीजबिलांच्या खर्चात कपात होऊन त्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे २५ वर्ष लाभ होतो. यासह सौर प्रकल्पाच्या यंत्रणेला लावलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. वीजबिलातील आर्थिक बचत व पर्यावरणस्नेही म्हणून वीजग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा.
- राजेंद्र पवार , मुख्य अभियंता, महावितरण