PM Awas Yojana Tendernama
पुणे

Pune: 'त्या' 4 हजार 140 जणांच्या हक्काच्या घराचे काय झाले?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे विभागातील चार हजार १४० भूमिहीनांचे हक्काच्या घराचे स्वप्न अद्यापही अधुरे राहिले आहे. या सर्व भूमिहीनांना पंतप्रधान आवास (PM Awas) योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. मात्र, बांधकामासाठी जागा मिळत नसल्याने घरकुल मंजूर होऊनही या सर्व जणांचे हक्काच्या घराचे स्वप्न होण्यात अडसर निर्माण झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक तीन हजार १८३ जणांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याने मात्र बाजी मारली असून, या जिल्ह्यातील भूमिहीनांसाठी मंजूर झालेली सर्व घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ४६७ जणांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील हा आकडा अडीच हजारांहून अधिक होता. परंतु, जिल्हा परिषदेने या घरकुलांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी खास शोध मोहीम राबविली होती. यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक घरकुलांना जागा उपलब्ध झाली. या शोध मोहिमेअंतर्गत विविध पाच प्रकाराने घरकुलांसाठी जागेचा शोध घेण्यात आला होता.

देशातील बेघरांना घर उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वी राजीव गांधी निवारा क्रमांक एक व दोन आणि इंदिरा आवास या तीन घरकुल योजना राबविण्यात येत होत्या. दरम्यान, देशात सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील बेघर व्यक्तींच्या प्रतीक्षा याद्या तयार केल्या आहेत. या याद्या मंजूर झाल्यानंतर राजीव गांधी निवारा क्रमांक एक व दोन या दोन्ही योजना बंद केल्या, तर इंदिरा आवास योजनेचेच रूपांतर २०१६-१७ पासून पंतप्रधान आवास योजनेत केलेले आहे.

सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार पुणे जिल्ह्यात २४ हजार बेघर कुटुंबांची प्रतीक्षा यादी तयार झालेली आहे. गेल्या चार वर्षांत या यादीतील १९ हजार २२४ कुटुंबांना घरकुल मंजूर केले आहे. यापैकी १४ हजार ५८१ घरकुल बांधून पूर्ण झाली असून, चार हजार ६४३ घरकुल अपूर्ण आहेत. उर्वरित साडेसात हजार बेघरांना २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्याने ही घरकुल मंजूर करण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते. याशिवाय शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये आणि रोजगार हमीतून ९० मनुष्यदिन कामांचा मोबदला म्हणून १८ हजार रुपये उपलब्ध करून दिले जातात.

पंडित दिनदयाळ उपाध्याय अनुदान

देशातील बेघरांना केंद्र पुरस्कृत विविध चार योजनांमधून घरकुल मंजूर करण्यात येते. मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यास, जागा खरेदीसाठी प्रत्येकी ५० हजारांचे जागा खरेदी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेला पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अनुदान योजना असे नाव दिले आहे.

विभागातील सद्यःस्थिती

- विभागात भूमिहीनांसाठी मंजूर घरकुल -- १०,६२३

- आतापर्यंत जागा उपलब्ध झालेली एकूण घरकुल -- ६,४८३

- जागा उपलब्ध न झालेली घरकुल -- ४,१४०

विविध आवास योजना

- पंतप्रधान, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजना