MSRTC Bus Tendernama
पुणे

Pune : ST महामंडळ ऑक्टोबरमध्ये प्रवाशांना काय देणार गुड न्यूज?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात २४७५ नवीन परिवर्तन बस दाखल होणार आहेत. सध्या याच्या प्रोटोटाइपच्या निर्मितीचे काम सुरू असून, ऑक्टोबरमध्ये नवीन बस ताफ्यात दाखल होतील.

पुणे विभागाला सुमारे १५० बस मिळणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईसह व अन्य मार्गांवर या बस प्रवाशांच्या सेवेत धावतील. महिला सन्मान, अमृत ज्येष्ठ नागरिक अशा योजनांमुळे एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे गाड्यांच्या संख्येत मात्र घट होत आहे. याशिवाय अनेक गाड्यांचे आयुर्मान दहा वर्षांपेक्षा जास्त झाल्याने गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. अशावेळी नवीन बस ताफ्यात येणे प्रवाशांसाठीच नव्हे तर महामंडळासाठीही चांगली बाब आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात १५ हजार ८०० बस आहेत. यातील सुमारे १४ हजार बस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत आहेत.

नवीन बस स्वमालकीच्या

नव्या बस महामंडळाच्या स्वमालकीच्या असतील. या बस नऊ मीटर लांबीच्या असून ‘२ बाय २’ स्वरूपाच्या आहेत. त्यांची प्रवासी क्षमता प्रत्येकी ४४ इतकी आहे. एका बसची किंमत सुमारे ३८ लाख रुपये आहे. यासाठी सुमारे १०१२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात ३०० बस दाखल होतील. त्यानंतर त्या टप्प्याटप्याने दाखल होतील.

खासगी कंपनीकडून बांधणी

महामंडळ सांगाड्याची खरेदी करून मध्यवर्ती कार्यशाळेत बसबांधणी करते. बांधणी झाल्यावर मध्यवर्ती कार्यालयाकडून विविध विभागांना बसचे वितरण केले जाते. या वेळी मात्र कंत्राट देण्यात आलेली खासगी कंपनीच सांगाड्याची बांधणी करणार आहे. त्यामुळे महामंडळाला जास्त खर्च करावा लागेल.

नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर प्रवाशांची चांगली सोय होईल. याशिवाय प्रवासी सेवेतही सुधारणा होईल. सध्या गाड्यांची कमतरता असल्यामुळे काही वेळा प्रवासी सेवेवर परिणाम होतो.

- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक,एसटी महामंडळ,  पुणे

नवीन बस दाखल होणे प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, मात्र महामंडळाच्या कार्यशाळा सक्षम असताना गाड्यांची बांधणी बाहेरच्या कंपनीकडून केली जाणार आहे. असे पुन्हा होता कामा नये. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतच नवीन गाड्यांची बांधणी झाली पाहिजे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस,  मुंबई