Chandrakant Patil Tendernama
पुणे

Pune: बालभारती-पौड फाटा रस्त्याबाबत काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बालभारती ते पौड फाटा रस्त्याबाबत (Balbharti To Paud Phata Road) महापालिका प्रशासनाने (PMC) पर्यावरणवाद्यांच्या सूचनांचा स्वीकार केला आहे. त्यांनी आणखी सूचना प्रशासनासमोर मांडाव्यात. त्याबाबत सामंजस्याने निर्णय व्हायला पाहिजे. शहराची वाढती लोकसंख्या व गरजा ओळखल्या पाहिजेत. त्यादृष्टीने पर्यावरणाचा विचार करून आवश्‍यक उत्तरेही शोधली पाहिजेत, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भूमिका स्पष्ट केली.

बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या कामाला महापालिकेकडून गती देण्यात येत आहे. त्याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू करणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र, काही पर्यावरणवाद्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनानेही बालभारती- पौड फाटा रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरू असल्याचे नमूद केले होते.

याविषयी पालकमंत्री पाटील यांना प्रश्‍न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, संबंधित रस्ता झाल्यास त्यातून वेळ व अंतर मोठ्या प्रमाणात वाचेल. शहराची लोकसंख्या ६० लाखांच्यावर गेली असून २०४० पर्यंत ही लोकसंख्या ९० लाखांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शहराच्या गरजाही बघितल्या पाहिजेत. पर्यावरणाचा विचार करून, त्याला आवश्‍यक उत्तर शोधले पाहिजे.