Road Tendernama
पुणे

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताय, मग ही बातमी वाचा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जुन्या पुणे-मुंबई मार्गावर (Old Pune - Mumbai Road) अजूनही विरुद्धदिशेने वाहन चालविण्याचा प्रकार सुरूच आहे.

शनिवारी पुणे आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षक शाहीद जमादार यांच्या पथकाने अशा वाहनांवर कारवाई केली. यासह सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १७ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी जुन्या पुणे-मुंबई मार्गावर ट्रॅव्हल्सचा मोठा अपघात झाला. अपघातग्रस्त बस विरुद्धदिशेने येत होती. त्यामुळे आरटीओ प्रशासन व महामार्ग पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून जुन्या पुणे-मुंबई मार्गावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे.

शनिवारी विरुद्धदिशेने येणाऱ्या, सीट बेल्ट न लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई केली. या वेळी विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ५० दुचाकीस्वारांना थांबवून ठेवण्यात आले. हेल्मेटविषयी त्यांचे प्रबोधन करून, समज देऊन सोडण्यात आले. सहायक मोटार वाहन निरीक्षक माधुरी सोनार, पल्लवी रसाळ व भाग्यश्री पाटील यांनी कारवाईत भाग घेतला.