Pune City Tendernama
पुणे

Pune Traffic : पुणे शहरातील 'मिसिंग लिंक'चे काम का रखडले?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला असून, पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीसह समाविष्ट गावांतील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावेत, अशी मागणी आहे. पण जागा ताब्यात घेताना त्यासाठी जागा मालकांकडून रोख मोबदला मागितला जात आहे. निधीअभावी महापालिका हा आर्थिक भार सोसण्यास तयार नाही. अर्थसंकल्पात शहरातील ४५ रस्ते विकसित करण्यासाठी फक्त १० कोटींची तरतूद केली आहे. पण यातून एकाही रस्त्याचे भूसंपादन होऊ शकत नाही हे वास्तव आहे.

पुण्याची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. शहरालगत असलेल्या आयटी पार्क, एमआयडीसीमुळे रोजगाराच्या संधी जास्त आहेत. तसेच शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येत असल्याने स्थलांतरीतांच्या लोकसंख्येत दरवर्षी मोठी भर पडत आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये उंच इमारती उभ्या राहत आहेत. पण रस्ते अरुंद असल्याने ते वाहतुकीस अपुरे पडत आहेत. त्यातच अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूचा बराचसा भाग व्यापला जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

महापालिकेने विकास आराखड्यात नवीन रस्ते, बोगदे प्रस्तावित केले आहेत. तर काही अस्तिवातील रस्त्यांचे रुंदीकरणही प्रस्तावित केले आहे. दोन वर्षापूर्वी प्रशासनाने अविकसित रस्त्यांचा अभ्यास करून ‘मिसिंग लिंक’चा अहवाल तयार केला. त्यात सुमारे ५५० किलोमीटर लांबीचे रस्ते आढळले आहेत.

त्यापैकी आतापर्यंत केवळ आठ रस्त्यांचे काम झाले आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ‘मिसिंग लिंक’च्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण त्या अंतर्गत तब्बल ४५ रस्ते दाखविण्यात आले आहेत. ही तरतूद अतिशय तोकडी असून, एकही रस्ता विकसित होऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रोख मोबदल्याचा हट्ट

भूसंपादनासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत, त्यामुळे महापालिका टीडीआर आणि एफएसआयच्या मोबदल्यात जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण लहान जमीन मालक, ज्यांचा बांधकाम व्यवसायाशी काहीही संबंध नाही, असे नागरिक टीडीआर, एफएसआय मोबदला म्हणून घेतल्यास त्यांना तो खर्ची कुठे पाडायचा असा प्रश्‍न पडतो.

एखादा बांधकाम व्यावसायिक जागा मालकाकडून टीडीआर, एफएसआय घेण्यास तयार झाला तरी तो भाव पाडून मागतो. त्यामुळे जागा मालक रोख स्वरूपात मोबदला मिळावा, यासाठी हट्ट करतात.

'या' भागातील आहेत ४५ रस्ते

- संचेती रुग्णालय ते विद्यापीठ चौक गणेशखिंड रस्ता ४५ मीटर करणे

- निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट पाषाण रस्ता ३० मीटर करणे

- बाणेर पाषाण लिंक रस्ता

- कात्रज दफनभूमीकडे जाणार रस्ता

- हिंगणे गावठाण लगत सर्वे क्रमांक ७५ मध्ये २४ मीटरचा रस्ता

- कात्रज ते नवले पूल दरम्यान सेवा रस्ता

- महंमदवाडी ते हांडेवाडी १८ मीटर रस्ता करणे

- विमाननगर लोहगाव येथील रस्ता

- कर्वेनगर महालक्ष्मी लॉन्स ते दुधाणे लॉन्स

- वारजे स्मशानभूमी ते डुक्कर खिंड, बावधन

- किनारा हॉटेल ते पेठकर साम्राज्य रस्ता २४ मीटर करणे

- राजयोग सोसायटी चौक ते सावित्री गार्डन रस्ता, धायरी

- बालभारती ते पौड रस्ता

- पौड रस्ता, आंबेगाव, कात्रज, अमनोरा ते केशवनगर यांसह अन्य रस्त्यांचा समावेश आहे

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मिसिंग लिंकचे रस्ते जोडण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम अपुरी असली तरी एफएसआय आणि टीडीआरच्या मोबदला देऊन भूसंपादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास अनेक जागामालक सकारात्मक प्रतिसाद देतात. लहान जागा मालक रोख बदला मागतात. ज्या ठिकाणी भूसंपादनाची मोठी रक्कम आहे, तेथे राज्य सरकारकडूनही आर्थिक मदत घेतली जात आहे. शहरातील रस्ते मोठे व्हावेत, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग