pune traffic Tendernama
पुणे

Pune Traffic : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर पोलिस आयुक्तांनी काय सांगितला उपाय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुणे महापालिकेच्या (PMC) सिग्नल यंत्रणेचे संपूर्ण नियंत्रण पोलिसांकडे द्यावे, अशी मागणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे सिग्नलसह महापालिकेचे अभियंते, ठेकेदार, पोलिसांकडे द्यावेत. महापालिकेने खर्चाची तरतूद करावी व त्याची टेंडर प्रक्रिया पोलिसांकडून केली जाईल, असे पत्रात नमूद केले आहे. त्यावर महापालिकेने पोलिसांना याबाबत पत्रव्यवहार करून भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगितले आहे.

शहरात महापालिकेने एटीएमएस या प्रणालीचा वापर करून १२५ सिग्नल अद्ययावत केले आहेत, तर अन्य १५८ सिग्नलसाठी स्वतंत्रपणे देखभाल, दुरुस्तीचे टेंडर काढून त्यावर महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देखरेख ठेवली जाते. शहरातील वाहतूक कोंडी वाढत असून, महापालिका आणि पोलिसांकडून एकत्रितपणे त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पोलिस आयुक्तांनी वाहतुकीच्या प्रश्‍नावर महापालिकेला पत्र पाठवले आहे. त्यात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जून महिन्यात घेतलेल्या बैठकीचा आणि जुलै महिन्यात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा दाखला दिला आहे. या बैठकीत महापालिकेची सिग्नल यंत्रणा हस्तांतरित करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे.

शहरातील १५८ ठिकाणी सिग्नल उभारण्याचे काम महापालिकेने केले आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला सव्वा कोटी रुपये खर्च केला जात आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने २०२४ ते २०२५ या वर्षासाठीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात देखभाल दुरुस्तीसाठी दोनऐवजी चार वाहने आणि कर्मचारी घ्यावेत, असा बदल पोलिस आयुक्तांनी सुचविला आहे. तसेच टेंडरची संपूर्ण कार्यवाही पुणे महापालिकेने करावी, परंतु संबंधित ठेकेदाराला पोलिसांनी उपभोक्ता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचे बिल काढावे.

महापालिकेने पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची तरतूद करावी, पण त्याची टेंडर प्रक्रिया पोलिसांकडून केली जाईल. या पत्राबाबत विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दुजोरा दिला. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगितले.

पत्रातील इतर मुद्दे...

- शहरातील सर्व सिग्नल वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडावे, सिग्नल सिंक्रोनाइज करावेत.

- वाहनांच्या गर्दीनुसार नियंत्रण कक्षातून सिग्नलच्या वेळा बदलता येतील.

- या प्रकल्पाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या विद्युत विभागातील उपअभियंता, सहअभियंता, कनिष्ठ अभियंता, ठेकेदार व टेंडरची कागदपत्रे पोलिसांकडे हस्तांतरित करावीत