Gultekdi marketyard Pune Tendernama
पुणे

Pune: पैसे कमावण्यासाठी ठेकेदाराने चक्क रस्त्याचाच घेतलाय ताबा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारात सर्व्हिस लेनमध्ये ठरवून दिलेल्या जागेत पार्किंग शुल्क (Parking Fee) वसुलीचे आदेश दिले आहेत. मात्र, बाजारातील गेट क्रमांक पाचजवळील रस्त्यावर पार्किंगसाठी ठेकेदाराने (Contractor) थेट अर्ध्या रस्त्याचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्ध्या रस्त्यावर दुचाकी पार्किंग करून शुल्क वसुली सुरू आहे. यामुळे शेतमालाच्या वाहनांसह इतर वाहनांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र बाजार समितीचे दुर्लक्ष होत आहे.

गूळ-भुसार बाजारातील गेट क्रमांक तीनपासून नजीक असलेल्या प्रवीण मसाले समोरील सर्व्हिस लेनमध्ये दुचाकी लावल्या जातात. या दुचाकींचा पार्किंग ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अनेक दिवसांपासून अर्ध्या रस्त्याचा ताबा घेत दुचाकीचा ठेका चालविण्यास सुरवात केली आहे. मनमानी पद्धतीने रस्ता अडवणूक करत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

या रस्त्याने फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, केळी आदी विभागात शेतीमाल खाली करून वाहने जातात. तीन नंबर गेटजवळच या ठेकेदाराने रस्ता अडविल्याने बाजारात वाहतुककोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीमालाच्या वाहनांसह बाजारात खरेदीसाठी येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर वाहने लावून पार्किंग शुल्क घेतले जात असल्यास ठेकेदाराला नोटीस दिली जाईल. गूळ-भुसार बाजारातील प्रवीण मसाले समोरील सर्व्हिस लेनमध्येच पार्किंगचे पैसे घेतले पाहिजेत.

- बाबासाहेब बिबवे, विभाग प्रमुख, सुरक्षा व अतिक्रमण, बाजार समिती

ठेकेदाराने रस्त्यावर पार्किंग केल्याने अर्धा रस्ता बंद होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. येथे असणाऱ्या भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दररोज या ठिकाणी वाद निर्माण होतात. याकडे समितीने लक्ष द्यावे.

- प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर