Vikram Kumar, PMC Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील 'ते' 5 रस्ते लवकरच होणार 'आदर्श'?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (PMC) शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आदर्श रस्ते’ उपक्रमाअंतर्गत सध्या पाच मुख्य रस्त्यांवरील विविध प्रकारची कामे वेगात सुरू आहेत. या रस्त्यांवरील ४० टक्‍क्‍यांपर्यंत कामे पूर्ण झाल्याचा दावा, महापालिका प्रशासनाने केला.

शहरात झालेल्या ‘जी २० परिषदे’च्या पार्श्वभूमीवर शहरातील काही रस्त्यांवर खड्डे दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छता, दुभाजक, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडांची लागवड करून रस्ते सजविण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील १५ रस्त्यांची निवड ‘आदर्श रस्ते’ म्हणून करण्याचे निश्‍चित केले होते.

महापालिकेने या रस्त्यांच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ४० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पथ विभागाने पावसाळा संपल्यानंतर कामे करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत सोलापूर रस्ता, नगर रस्ता, बाणेर रस्ता, सूस रस्ता, पौड रस्ता या रस्त्यांवरील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे.

पुणे महापालिकेने एक ऑक्‍टोबरपासून या रस्त्यावरील अतिक्रमणे, ओव्हरहेड केबल्स, रस्त्यांवरील राडारोडा, पथ दुरुस्तीची कामे, दुभाजक रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, सिग्नल सिंक्रोनायझेशन, वीजेचे रोहित्र काढणे, सीसीटीव्ही, अनधिकृत फ्लेक्‍स, होर्डिंग काढणे या स्वरूपाची कामे आतापर्यंत केली आहेत.

काही ठिकाणी सेवा वाहिन्यांच्या नावाखाली वारंवार रस्ते खोदाईचा सुरू असलेला प्रकार थांबविण्यासाठी स्वतंत्र पाइप टाकण्यात येत आहेत. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) कामांसाठीच्या टेंडर काढण्यात आल्या आहेत, तेथील कामालाही लवकरच सुरवात होईल.

शहरातील ‘आदर्श रस्ते’

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता.

आदर्श रस्त्यांतर्गत शहरातील पाच रस्त्यांची कामे ४० टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांची कामेदेखील लवकरच पूर्ण करण्यात येतील.

- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका