PMC Tendernama
पुणे

Pune : यंदाच्या गणेशोत्सवाचे 'हे' आहे वेगळेपण! महापालिकेकडून जोरदार तयारी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणेकरांना एकीकडे गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतानाच, दुसरीकडे उत्सवकाळात स्वच्छ राखली जावी, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. निर्माल्य टाकण्यासाठी आवश्‍यक कंटेनर, मूर्ती संकलन केंद्र व मूर्ती विसर्जनासाठीचे हौद, लोखंडी टाक्‍या यांसारख्या विविध प्रकारच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग प्रमुखांच्या सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्सवाच्या काळात शहरात स्वच्छता ठेवण्यास अधिक महत्त्व दिले जाणार आहे. त्यादृष्टीने घनकचरा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात निर्माल्य टाकण्यापासून ते मूर्ती विसर्जनापर्यंतच्या सुविधा देण्यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हौद, लोखंडी टाक्‍या, मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य कंटेनर यांची संख्या वाढविली आहे.

अशी आहे कंटेनर व्यवस्था

सर्वाधिक निर्माल्य कंटेनर हडपसर - मुंढवा क्षेत्रीय कार्यालय - ३६, त्यापाठोपाठ सिंहगड रोड -३४, वारजे - कर्वेनगर - २४, धनकवडी - सहकारनगर -२०, कोथरूड - बावधन व बिबवेवाडी - प्रत्येकी १९, कसबा - विश्रामबाग - १५, औंध - बाणेर व येरवडा - कळस - धानोरी येथे प्रत्येकी १४, ढोले पाटील रस्ता येथे १३, कोंढवा - येवलेवाडी १३ , शिवाजीनगर घोले रस्ता - १२ यांच्यासह अन्य क्षेत्रीय कार्यालयांना देखील महापालिकेने यावेळी पुरेशा प्रमाणात निर्माल्य कंटेनर उपलब्ध करून दिले आहेत.

मूर्ती संकलन केंद्रातही यंदा वाढ

सर्वाधिक मूर्ती संकलन केंद्र कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असून त्यांची संख्या ३९ इतकी आहे. त्यापाठोपाठ हडपसर-मुंढवा येथे ३६, सिंहगड रस्ता येथे २५, कोथरूड-बावधन व धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी १९, औंध बाणेर येथे १७, शिवाजीनगर घोले रस्ता १६ इतक्‍या संख्येत मूर्ती संकलन केंद्र असणार आहेत.

मूर्ती विसर्जनासाठी आवश्‍यक लोखंडी टाक्‍या सर्वाधिक धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ७७ असतील. त्यापाठोपाठ वारजे-कर्वेनगर ७१, कोथरूड-बावधन ६७, कोंढवा येवलेवाडी ५८, कसबा-विश्रामबाग ५७, बिबवेवाडी ५४ अशा पद्धतीने महापालिकेने लोखंडी टाक्‍या उपलब्ध केल्या आहेत.

तसेच वारजे-कर्वेनगर येथे आठ हौद असतील, शिवाजीनगर घोले रस्ता, धनकवडी सहकारनगर व कोंढवा येवलेवाडी येथे प्रत्येकी सहा, भवानी पेठ, ढोले पाटील रोड व येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी तीन हौदांची व्यवस्था असणार आहे.

आकडे बोलतात

तपशील : २०२२ : २०२३ : झालेली वाढ

लोखंडी टाक्या : ३५९ : ५५८ : २०९

मूर्ती संकलन केंद्र : २१६ : २५२ : ३६

निर्माल्य कंटेनर : २०६ : २५६ : ५०